अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो.हा उत्सव नऊ रात्री चालतो म्हणून यास नवरात्र असे जरी आपण म्हणत असलो तरी काही वेळा तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे आठ किंवा दहा दिवसाचेही होऊ शकते.मातःक्षमस्व म्हणून दशमीला याची सांगता होते.हा उत्सव अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो.
नवरात्र मध्ये घटस्थापना,उपवास,पंचमीस ललीता पूजन,षष्ठी ते नवमी पर्यंत सरस्वती आवाहन पूजन आणि विसर्जन. प्रतिपदा ते नवमीपर्यंत माला बंधन इ.कार्यक्रम नऊ दिवस असतात.
अश्वीन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापनेसाठी एका पत्रावळीत/पात्रात माती घेऊन शेत तयार केले जाते. ॐ वेदिकाय नमः या मंत्राने मातीची पूजा करून, ॐ सप्त धान्यभ्यो नमः या मंत्राने त्या मध्ये आपल्या घरातील धान्य घालून, ॐ वरूणाय नमः या मंत्राने पाण्याने भरलेल्या मातीच्या घटाची पूजा करतात आणि तो घट वेदिकेवरती ठेवून मुख्य देवतेची स्थापना केली जाते.खाऊच्या पानावर स्वस्तिक काढून पहिली माळ खाऊच्या पानाची बांधतात आणि दिव्याची पूजा करून अखंड नऊ दिवस नवरात्री दीप प्रज्वलीत ठेवतात.
या व्रत्तातील विज्ञान पाहिलेस घटस्थापना म्हणजे वरूण वेदिका स्थापना होय.अर्थात वेदिका म्हणजे शेती व वरूण म्हणजे पाणी.माती आणि पाण्याचा जणू गौरवच !
मानवाच्या संपूर्ण भरण पोषणाचा भार शेती उचलते,सुपाने घातले तर खंडीने उगवते तसेच पाणी म्हणजे जीवन !
मानवाने निसर्गातील कृषी मातेचे व जलदेवतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी घटस्थापनेची निर्मिती केली असावी मला वाटते.या वेळी नुकतीच पावसाळी पिके निघून हिवाळी पिकांच्या पेरणीचा मोसम सुरू होणार असतो.या नऊ दिवसात वेदिकेत पेरलेले,आपल्या घरातील बीज शेतीत पेरण्यास योग्य आहे की नाही,या अत्यंत कमी खर्चातील प्रयोगासाठी घटस्थापनेच्या पूजेची स्थापना झाली असावी असे मला वाटते.
तसेच दशमीला उगवलेला अंकुर देवाला वाहण्याची प्रथा आहे.अर्थात जे देवासाठी ते देहासाठी.आयुर्वेदानुसार गव्हांकुराचे महत्त्व वेगळे सांगायला नको.
नवरात्रीला कुमारी पूजेच्या निमित्ताने स्त्रीला मानाचे स्थान व तिचा सन्मान तिच्या लहानपणीच या व्रत्ताने केलेला दिसतो.
चिंतन,ध्यान,उपोषण परांन्न सेवन,ऐहिक सुखाचा त्याग ब्रह्मचर्य यामुळे रहाटगाड्यातून मुक्तीकडे जाण्याचा संदेश आपोआप आपणास मिळतो.
या मध्ये षष्ठी ते नवमीच्या काळात सरस्वती आवाहन,पूजन आणि विसर्जन हा विधी केला जातो.सरस्वती आवाहन म्हणजे नवीन पुस्तकाची खरेदी.पूजन म्हणजे त्याचे चिंतन आणि विसर्जन म्हणजे परत नवीन वाचन’ यावरून प्रत्येकाच्या घरी ग्रंथालय अपेक्षित आहे.आज इतरांच्यात राहू दे,निदान ज्ञानदान करणारे उदा. शिक्षक अध्यापक यांचे घरी तरी ग्रंथालय हवे कारण ग्रंथ त्यांचे शस्त्र होत.यावर हे व्रत्त वाचन संस्कृती जपण्यास मदत करते असे मला वाटते.
मला बंधनाने दिगबंधित होऊन नवरात्रीच्या ज्योतीने आपलं जीवन प्रकाशमय होऊन,या आत्म ज्योतिचा प्रकाश आपल्या संपूर्ण अंतरंगात पसरून,आपलं जीवन चैतन्यमय आणि सुखमय व्हावे.
शंका समाधान
(ग्रंथाधार – काल सुसंगत आचार धर्म-दाते पंचांग)
प्रश्न : देव बसलेले असल्यामुळे देवी बरोबर इ देवानाही आम्ही न हलवता पूजा करतो हे कितपत योग्य आहे?
उत्तर : हे पूर्ण अयोग्य आहे नवरात्र हे देवीचे असल्यामुळे देवघरातील इतर देवांची नेहमी
प्रमाणे रोज पूजा केली पाहिजे.
प्रश्न : काही वेळा नवरात्र दहा दिवसाचे ही होऊ शकते त्यावेळी माळा किती अर्पण कराव्या?
उत्तर : नवरात्र मध्ये देवीस रोज एक माळ या प्रमाणे जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात तिथिचा क्षय आहे म्हणून एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नये.
प्रश्न : नवरात्रात अशौच आले आणि प्रतिपदेला नवरात्र बसवता नाही आले तर तर काय करावे?
उत्तर : सप्तरात्रोत्सवारंभ,पंचरात्रोत्सवारंभ, एकरात्रोत्सवारंभ असे पंचांग किंवा ,कॅलेंडर मध्ये दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र केले तरी चालते असे शास्त्र आहे.
प्रश्न : नवरात्र सुरू झाल्या नंतर अशौच आले तर काय करावे?
उत्तर : पूजा दुसऱ्याकडून करून घ्यावी रोज पूजा करण्यास कोणी मिळाले नाही तर शेवटच्या दिवशी पूजा करून नवरात्र उठून घ्यावे .
प्रश्न : एखाद्या घरात व्यक्तीचे निधन घडते त्यावर्षी नवरात्र न बसवण्याचा प्रघात आहे हे कितपत शास्त्रीय आहे?
उत्तर : हे अशास्त्रीय आहे.
शारदिय(देवी) नवरात्र 2023
रविवार दि.15 ऑक्टों . 2023
घटस्थापना नवरात्रारंभ
रविवारदिनांक 15 ऑक्टो. 2023 सप्त रात्रोत्सवारंभ
गुरुवार 19 ऑक्टो . 2023
ललिता पंचमी,पंचरात्रोत्सवारंभ
शुक्रवार दि.20ऑक्टो . 2023
सरस्वती आवाहन
शनिवार दि. 21 ऑक्टो .2023
महालक्ष्मी पूजन ( घागरी फुंकणे) सरस्वती पूजन,त्रिरात्रोत्सभारंभ
रविवार दि.22 ऑक्टो .2023
दुर्गाष्टमी,महाष्टमी उपवास,सरस्वती बलिदान सरस्वती विसर्जन
सोमवार 23ऑक्टो. 2023
नवरात्रोत्थापन व पारणा,आयुध नवमी – शस्त्रपुजा (खंडे नवमी) ,देवीला बलिदान, नवमी उपवास
24ऑक्टो. 2023
विजयादशमी दसरा,अपराजिता व शमीपूजन सिमोल्लंघन,अश्वपूजा
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.