‘मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!’
NASA ला जमले नाही ते ISRO ने करून दाखवले
देशभरात अभूतपूर्व जल्लोष…
नवी दिल्ली | भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली.चांद्रयान 3 नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं कौतुक केलं आहे त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.संपूर्ण जग या क्षणाची वाट पाहत होते. या ऐतिहासिक क्षणाचे कोट्यवधी साक्षीदार झाले.
हे यश भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरले आहे. असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितले आहे.अंतराळ संशोधनात भारताच्या प्रगतीचे ते प्रतीक आहे. एजन्सीने सांगितले की मिशन वेळापत्रकानुसार आहे. यंत्रणाही नियमित तपासली जात आहे. यासोबतच मिशनचे निरीक्षण करणारे लोकही उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहेत.जगातील कुठल्याही देशाने असे यश मिळविलेले नाही.जी बाजू पृथ्वीला दिसत नाही त्या जागेवर चांद्रयान उतरले आहे.
‘मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!’
चांद्रयान-3 ने चंद्रावर पोहोचताच इस्रोला खास मेसेज पाठवला आहे.इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे इस्रोने ट्वीट करत म्हटले आहे की, ”चांद्रयान-3 मिशन : भारतीय, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण – चांद्रयान-3”. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचले आहे.भारताने जणू चंद्रच कवेत घेतला,अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
इस्रोचे 16 हजार 500 शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत आज यशस्वी झाली आहे. सॉफ्ट लँडिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या जगातील चार देशांमध्ये आता भारताचे नाव सामील झाले आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली भारताची चंद्रमोहिम यशस्वी ठरली आहे.प्रत्येक भारतीयाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून गेली आहे.चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारताने हार मानली नाही.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचे फळ आज मिळाले आहे.
चांद्रयान-3 मोहीम अशी झाली फत्ते
- विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला.पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सुमारे 11.5 मिनिटे लागली.म्हणजेच 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत.
- यान 7.4 किमी उंचीवर पोहोचला तोपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता.पुढचा टप्पा 6.8 किलोमीटरचा होता.
- 6.8 किमी उंचीवर वेग कमी होऊन 336 मीटर प्रति सेकंद झाला.पुढील टप्पा 800 मीटर होता.
- 800 मीटर उंचीवर,लँडरच्या सेन्सर्सने चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली.
- 150 मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद होता.म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान.
- 60 मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद होता.म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान.
- 10 मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद होता.
- चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
ऐतिहासिक क्षण !
6.03 वाजता : चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे.यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे.तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा !
चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचं अभिनंदन केले. तसेच ‘इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला.ऐतिहासिक क्षण पाहून धन्य झालो हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे.हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे.हा क्षण 140 कोटी भारतीयांच्या आशेचा आहे.यामुळे नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे’.
त्याशिवाय देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे.अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी इसरो आणि तेथील शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.
मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
भारताचे यश फक्त भारताचे नाही तर हे संपूर्ण जगाचे आहे.इस्त्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल 1 मिशन लाँच करणार आहे.त्यानंतर शुक्र ग्रह देखील इस्त्रोच्या आगामी काळात असेल.गगनयान याद्वारे पहिल्या मानवसहीत अंतरळान पाठवणार आहे.भारताचा आधार विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. आजचा दिवस देश लक्षात ठेवेल.आजचा दिवस आपल्याला पराभवातून धडा घेऊन यश कसे मिळवले जाते याची साक्ष देणारा आहे,असे नरेंद्र मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना
मुंबई | भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले.मुख्यमंत्री म्हणतात की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.
काँग्रेसचे फटाके वाजवून सेलिब्रेशन
चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर पुढे काय?
चांद्रयान-3 मोहिमेचं पहिले लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं आहे.चांद्रयानमधील लँडरचे नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचे नाव ‘प्रज्ञान’ आहे.विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.चांद्रयान-3 चे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला आहे.
चंद्रावर उतरताच…
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच विक्रम लँडरचा एक साईड पॅनल दुमडला जाईल,ज्यामुळे रोव्हरला चंद्रावर उतरण्यासाठी रस्ता मोकळा होईल.
रोव्हर खराब होऊ नये याच दृष्टीने लँडरची निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून तो चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.
हे रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे,जे चंद्रावर फिरून त्याची छायाचित्रे गोळा करेल.
या रोव्हरवर इस्रोचा लोगो आणि तिरंगा लावण्यात आला आहे.ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चार तासांनी लँडरमधून बाहेर पडेल.
रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर एक सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरेल.यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्रावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल.
रोव्हर चंद्राच्या हवामानाची माहिती घेईल.त्यात असे पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल.चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं प्रमाण देखील शोधण्याचे काम तो करेल.
जसजसं रोव्हर पुढे सरकेल तसं चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय तिरंगा आणि इस्रोचा लोगो तयार होईल.
रोव्हर अशा पद्धतीने बनविण्यात आलाय की तो चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करू शकेल.रोव्हर ही माहिती गोळा करून लँडरला पाठवेल.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लँडरकडे दोन आठवड्यांचा वेळ असणार आहे.
रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो.त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत ही माहिती केवळ लँडर मार्फतच पोहचू शकते.
चंद्रयान-3 मध्ये काय काय आहे?
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत.
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचं सॉफ्ट लँडिंग करणं
- लँडरमधून रोव्हरला उतरवणं आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणं
- लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचं अन्वेषण करणं
चंद्रयान-2 मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या चंद्रयान 3 मध्ये काढून टाकत लँडर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.
प्रपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर सात प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. यामध्ये लँडरवरील चार, रोव्हरवरील दोन आणि प्रोपल्शन मॉड्यूलवरील एक यंंत्राचा समावेश आहे.
इस्रोने चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसह विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलचा भाग म्हणून पाठवले होते.
चांद्रयान-2 चं लँडर चंद्रावर कोसळलं, पण ऑर्बिटर जवळपास चार वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आहे.
त्यामुळेच यावेळी इस्रोने चांद्रयान-3 मध्ये फक्त लँडर आणि रोव्हर पाठवले आहेत. म्हणजेच चांद्रयान-3 चा लँडर चांद्रयान-2 सोबत प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरचा वापर पृथ्वीसोबत संवाद साधण्यासाठी करेल.