सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांचे आवाहन
सांगली । ईट राइट इंडिया मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी फॉसटॅक प्रशिक्षण व हायजिन रेटींगबाबतचे प्रशिक्षण घ्यावे व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी हायजिन रेटींग ऑडिट करुन घ्यावे,असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यामधील विविध तरतुदींबाबत अन्न व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी श्री. मसारे यांनी जिल्ह्यामधील विविध अन्न व्यावसायिकांच्या बैठका घेतल्या.यामध्ये सांगली शहर, वाळवा तालुक्यातील हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिक,सांगली शहरामधील स्वीट शॉप व बेकरी अन्न पदार्थ विक्रेते तसेच पलूस तालुक्यामधील हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिक,स्वीट शॉप व बेकरी अन्न पदार्थ विक्रेते यांच्या बैठका घेवून कायद्यामधील तरतुदींचे पालन करण्याबाबत सूचित केले.
या बैठकांमध्ये उत्पादनाच्या ठिकाणाची स्वच्छता राखणे, पेस्ट कंट्रोल, कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, अन्न पदार्थ साठवणूक, लेबल वर्णन तसेच परवान्याबाबत अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये अन्न पदार्थ उत्पादन व विक्री करतेवेळी सर्वंकष निकषांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.
त्यानंतर श्री. मसारे यांनी ईट राइट इंडिया मोहिमेंतर्गतच्या अन्न व्यावसायिकांकरिताच्या फॉसटॅक प्रशिक्षण व हायजिन रेटींग बाबतची माहिती दिली व सर्व अन्न व्यावसायिकांनी हे प्रशिक्षण घ्यावे व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाच्या गुणवत्ता वाढीसाठी हायजिन रेटींग ऑडिट करुन घ्यावे, असे निर्देश दिले.