नवी दिल्ली | सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी (व्हेगन) पदार्थांमुळे भारतीय खाद्यसंस्कृतीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.टेस्ट अॅटलास या फूड गाइड प्लॅटफॉर्मने नुकतीच क्रमवारी जाहीर केली.या यादीमध्ये टॉप 10 मध्ये परदेशी पदार्थांचे वर्चस्व असले तरी ११ वे स्थान भारतातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘मिसळ पाव’ ने पटकावले आहे.
ग्वाकामोल, हम्मस आणि फलाफल, मसाला वडा यांसारख्या इतर पदार्थांचा ही या यादीमध्ये समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रसिध्द पदार्थ मिसळीचा समावेश करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली गेली आहे. या ५० पदार्थांच्या यादीमध्ये मिसळीचा ११ वा क्रमांक लागला आहे. जागतिक वेगन पदार्थांच्या यादीमध्ये मिसळीचा समावेश करण्यात आल्याने तिच जागतिक पातळीवरही महत्व वाढणार आहे यात काही दुमत नाही.
सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी पदार्थांच्या यादीत ७ भारतीय पदार्थांचा समावेश
हा यादीत स्थान मिळवणारा मिसळ एकमेव भारतीय पदार्थ नव्हता.एका लोकप्रिय फूड गाईडने प्रसिद्ध केलेल्या ५० सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी पदार्थांच्या यादीत एकूण ७ भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा समावेश झाला आहे.मिसळसोबतच आलू गोबीने २० वे स्थान पटकावले,२२ व्या स्थानावर राजमा आणि २४ व्या स्थानावर गोबी मंचुरियनने स्थान मिळवले आहे.राजमा चावल हा वेगळा पदार्थ मानला गेला आणि ४१ व्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातून फक्त मिसळ नव्हे तर भेळपूरीने देखील मारली बाजी
‘मिसळ पाव’ ला मिळालेल्या नव्या ओळखीमुळे तुम्ही आधीच आनंदित असाल तर तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय स्ट्रीट फूड भेळ पुरीने देखील टॉप ५० मध्ये स्थान मिळवले असून आणि ३७ व्या स्थानावर कब्जा केला आहे. भेळ पुरी हा चाट पदार्थ मानला जातो आणि ज्यात कुरमुरा, कांदा, टोमॅटो, बटाटे, शेंगदाणे, शेव इत्यादी गोड आणि मसालेदार चटण्या मिसळून बनवला जातो.