Last Updated on 22 Nov 2025 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर | शेतीमध्ये भविष्याचे वेध घेणारे कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखे तंत्रज्ञान वापरून शेतीचे भविष्य बदलू शकते.आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बारामती येथे क्लस्टर फार्मिंगच्या स्वरूपात लहान भूधारक शेतकऱ्यांनीही उसाची विक्रमी लागवड केली. विदर्भात देखील लहान शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान किफायतशीर दरात उपलब्ध होऊ शकते त्यांना देखील विक्रमी उत्पादन घेण्याची संधी आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच ॲग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘संत्रा : स्पेन, इस्रायल… व्हाया विदर्भ’ या पुस्तकाच आज प्रकाशन आज ॲग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनामध्ये करण्यात आले त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते . या पुस्तकात इस्रायल, स्पेन आणि विदर्भातील पारंपरिक संत्रा लागवडीबाबत अभ्यासकांनी तुलनात्मक निरीक्षण मांडले आहे. काही महिन्यांपूर्वी गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भातील 40 संत्रा उत्पादकांची टीम स्पेन येथील व्हॅलेन्शिया संत्रा लागवडीचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. व्हॅलेन्शिया येथील संत्रा लागवडीची पद्धत, येथील नर्सरी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग इतर अनेक गोष्टींची इत्तंभुत माहिती स्पेनवरून आल्यानंतर ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने संत्रा उत्पादकांसाठी एका नागपुरात कार्यशाळेच्या माध्यमातून मांडण्यात आली .या माहितीचे संकलन या पुस्तकात आहे . स्पेन, इस्रायल आणि विदर्भातील संत्रा लागवडीचे सध्याचे चित्र मांडले आहेच. शिवाय कोणत्या नव्या बदलांची गरज आहे, हे सांगताना एआयचा कसा फायदा होऊ शकतो हे देखील तांत्रिक निकषांचा आधार घेऊन मांडले आहे. त्याचवेळी वाशीम सारख्या आकांक्षी (अस्पायरेशनल) जिल्ह्यासह वऱ्हाडात संत्रा उत्पादकांनी केलेले यशस्वी प्रयोग देखील यात आहेत.
या पुस्तकाचे संकलन-संपादन नितीन नायगांवकर यांनी केले आहे. तर गडकरी यांचे सहायक खासगी सचिव डॉ.प्रवीण भालेराव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे.
या दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी सांगितले की तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण करून लागवड खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे या त्रिसूत्रीचा वापर करून संत्रा उत्पादकांनी आपल्या संत्र्यांच्या पॅकेजिंगचे देखील तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून त्याला जागतिक बाजारपेठ मिळेल .
21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ऍग्रो व्हिजन येथील कृषी प्रदर्शनामध्ये विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यशाळांना विदर्भातील तसेच संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि प्रतिसाद मिळत आहे .
आज ॲग्रोव्हिजनच्या दुस-या दिवशी ‘ऊस लागवड’ विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .या कार्यशाळेला संबोधित करताना गडकरी म्हणाले ,‘उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे संत तुकाराम महाराज म्हणायचे. उत्तम बीज, उत्तम कलम, उत्तम जमीन असेल तर नक्कीच उत्पादनही उत्तम मिळेल. त्याअनुषंगाने, उत्तम नर्सरी तयार केली जात असून सरकारतर्फे त्यासाठी धोरण तयार केले जात आहे, या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी मातीमध्ये ऑरगॅनिक कार्बनसह कोणती पोषक द्रव्ये आहे, हे तपासून घेत सॉईल हेल्थ कार्ड तयार करावे, असे सांगताना नितीन गडकरी यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तुर, संत्रा, कापूस अशा उत्पादनाचे एकरी उत्पादन वाढवू शकतो. त्यातून शेतक-यांना 3 ते 4 लाख रुपये फायदा होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला.









































































