पुणे । शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने मोटार वाहन कायदा कलम ११५ (१)(२)(बी), ११६ (४) व ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा (अत्यावश्यक सेवेतील वाहने – अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका इ. वगळता) ४० किमी प्रतितास करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
सदरचे आदेश ४ डिसेंबर २०२५ पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत, रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीडगन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.









































































