Last Updated on 14 Nov 2025 11:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली. 19 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आचार संहिता संपल्यानंतर लगेचच ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रूपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत देशातील 11 कोटीपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना 20 हप्त्यात 3.70 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे.
लाभार्थी आणि निधी:
या योजनेअंतर्गत देशभरातील ९ कोटींपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाईल. यासाठी साधारणपणे १८ हजार कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.
अपात्र लाभार्थी वगळले:
योजनेतून जवळजवळ ३२ लाख अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी, जमिनीच्या चुकीच्या नोंदी केलेले लाभार्थी आणि फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेले लाभार्थी यांचा समावेश आहे. या अपात्र लाभार्थ्यांना वगळता पात्र शेतकऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी २१ व्या हप्त्याचे वितरण केले जाईल.











































































