Last Updated on 29 Nov 2025 7:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपुर । उरुण ईश्वरपुर नगरपरिषद निवडणुक ही ३६ वर्षे व ५ वर्षाच्या विकासात्मक प्रगतीच्या आलेखावर मतदारांनी करण्याचे ठरविले आहे. विरोधकांना या निवडणुकीत पराभव दिसु लागल्याने सैरभैर झाले आहेत. व्देष, दबावतंत्र, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. असंस्कृत,शिवराळ विचार व दहशत मोडुन काढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, मात्र लोकशाही मोडीत काढणार्या टोळ्यांना व त्यांच्या म्होरक्याला शहरातील मतदार त्यांची जागा दाखवतील असे मत सांगली जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केले.
उरुण ईश्वरपुर शहरातील प्रभाग क्र.४,१४,१५ च्या कोपरा सभेमध्ये बोलत होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, महायुती ही अभेद्य आहे,जयंत पाटील गटात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. कारण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राज्यातील इतर शहरापेक्षा आपले शहर विकासात्मक दृष्ट्या मागे राहीले.त्यांच्या पार्टीत संघटक, व्हिजन असणारी व शहरातील जनतेबद्दल जिव्हाळा असणारी माणसं चालत नाहीत.मी माझ्या शहरासाठी, माझ्या माणसांसाठी २०१६ ची निवडणुक लढविली.जयंत पाटील यांनी ३१ वर्षे मतदारांना आश्वासने देऊन निवडणुकीत निवडणुका जिंकल्या, शहर वासियांच्या पदरी निराशा दिली, शहर कित्येक वर्षे मागे पडले याला जयंत पाटील यांचे अपयशी नेतृत्व कारणीभुत आहे.
माझ्या निवडणुकीत जी आश्वासने दिली ती पाच वर्षे सत्ता काळात मंजुरी आणण्यापासुन पुर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. भुयारी गटर योजना, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण,शहराला चौहुबाजुने जोडणारे रस्ते, शहरातील अंतर्गत रस्ते, गटर, स्ट्रीट लाईट, बगीचे, मटण मार्केट याच बरोबर काही मागे स्वखर्चातुन केली. प्रशासन स्तरावरील कामांना गती दिली. सभागृहातील कामकाजामध्ये पारदर्शकता यावी,विकासावर व शहरातील जनतेच्या हितावर चर्चा व्हावी यासाठी सभाचे ऑनलाईन चित्रण सुरु केले. ही आमच्या कामातील पारदर्शकता आहे.
जयंत पाटील कार्यकर्त्याला आवरा…
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, जयंत पाटील यांचा प्रभाग क्र. तीन मधील उमेदवार शिवराळ भाषा वापरुन मतदार व विरोधी अल्पसंख्यांक उमेदवारांवर दबाब व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.मागील २०१६ च्या निवडणुकीत याच उमेदवाराने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.जयंत पाटील यांनी अशा वृत्तीला आवर घालावा अन्यथा मतदार त्यांचा बंदोबस्त करतील.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, युवा नेते केदार पाटील, हेमंत पाटील, अशोक पाटील, ॲड. संपतराव पाटील, सुधाकरराव जाधव, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे, नगरसेवक पदाचे उमेदवार अजित पाटील, सौ.विद्या पवार, राजवर्धन पाटील, श्रीमती सुवर्णा पाटील, अक्षय कोळेकर, प्रिया कांबळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.











































































