Last Updated on 29 Nov 2025 8:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर । विरोधकांच्यामध्ये कोणताही ताळमेळ नाही,एकमत नाही. त्यांच्याकडे शहराच्या विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. मुंबईच्या दबावातून ते माझ्या विरोधात एकत्र येऊन लढत आहेत. ही मंडळी या शहराचा कसला आणि काय विकास करणार? असा सवाल माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथील प्रभाग क्रमांक ३ मधील कोपरा सभेत बोलताना केला. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या सत्ता परिवर्तनाचे आपण शिलेदार व्हा,असे आवाहनही त्यांनी केले.
निनाईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग ३ मधील उमेदवार खंडेराव जाधव (नाना) व सौ.शुभांगी प्रकाश शेळके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रणधीर पाटील,प्रा.शामराव पाटील,माजी नगराध्यक्ष पै भगवान पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी नगरसेविका जयश्री पाटील,संजय कानडे,विनायक महाजन,सौ. रुपाली जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेला महिला युवक व मतदारांची प्रचंड गर्दी होती.
आ.पाटील म्हणाले, शहरात तीन टोळ्या आहेत. त्या टोळ्यांनी कमळ,घड्याळ,धनुष्यबाण या चिन्हावर ताबा मिळविला आहे. ही मंडळी शहराचा विकास करू शकत नाही. विरोधी मंडळींनी शहरातील जनतेच्या आयुष्यातील तब्बल ९ वर्षे वाया घालविली आहे. त्यांना पुन्हा संधी द्यायची का? खंडेरावनाना या भागात एक व्यायाम शाळा उत्तम चालवितात. त्याच्यावरही काही जणांचा डोळा होता. आपण निनाईनगरात सुंदर बाग उभा केली होती. मात्र सत्ताधारी मंडळींना त्याची निगा राखता आली नाही,तिची पूर्ण दुर्दशा झाली आहे. मी मध्यंतरी मुद्याधिकाऱ्यांना सूचना केल्या,त्याप्रमाणे काही दुरुस्त्या करण्यात आल्या. खंडेरावनाना हे माझे विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी आहेत. ते सरळ व नम्र आहेत. मात्र कोणी अंगावर आला,तर खांद्यावर घेणारे आहेत. हा माझा घरचा प्रभाग आहे. आपण खंडेराव नाना,शुभांगी शेळके यांना विक्रमी मतांनी विजयी करा,या भागातील प्रलंबित कामे आम्ही मार्गी लावू.
आनंदराव मलगुंडे म्हणाले,गेल्या वेळची चूक दुरुस्त करून आम्हाला सेवेची संधी द्यावी. आम्ही हे शहर स्वच्छ,सुंदर व प्रगत शहर बनविण्यासाठी कष्ट करू.
खंडेराव जाधव म्हणाले,नगराध्यक्ष हा या शहराला लागलेली साडे साती आहे. या माणसाने शहराचे वाटोळे केले. आमचे या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे कित्येक वर्षाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. आपल्यातून तिकडे गेलेले सांगतात,साहेबांच्या डाव्या – उजव्या बाजूला हे – हे असतात. हे आपल्याकडे असताना हे दोघे बंधू डाव्या – उजव्या बाजूलाच बसत होते ना?
रणधीर पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील हे आपल्या तालुक्याची ओळख आहे. त्यांना ताकद द्यावी. देशात जाती – धर्मात तेढ निर्माण केले जात असून समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे काम केले जात आहे. त्यांचा डाव ओळखून सावध पणे मतदान करावे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक शैलेश पाटील,माजी नगरसेवक सदानंद पाटील,राजवर्धन लाड,प्रकाश जाधव,प्रकाश शेळके,प्रशांत भोसले,सुनील चव्हाण,प्रा.शरद कुंभार,डॉ.इक्बाल मुल्ला, हमीद लांडगे,किरण पाटील,सागर जाधव,अक्षय पाटील,विश्वजित पाटील,अभिजीत सवाखंडे,शशिआप्पा पाटील, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्त्री -पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिकडे गेले त्यांना धन्यवाद!
आपल्यातून काहीजण तिकडे गेले,ते बरे झाले. त्यामुळे आनंदराव मलगुंडे यांना संधी देता आली. ते आपल्याकडे होते,तेव्हा ते विरोधकांच्यावर टीका करीत होते. मात्र आता त्यांचे समर्थन करताना पाहून दया येते.











































































