Last Updated on 13 Oct 2024 3:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ख्यातनाम उद्योगपती,टाटा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख,पद्मविभूषण स्व.रतनजी टाटा यांनी टाटा समूहाचा आपल्या देशासह जगात विस्तार करताना काही मूल्यांची जपणूक केली आहे. त्यांची साधी राहणी,दातृत्व व देशप्रेम आपणा देशवासियांना निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण देशात आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकासात केलेले योगदान मोलाचे आहे,या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी स्व.टाटा याना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राजारामबापू उद्योग समूहाच्या वतीने स्व.रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अँड.चिमण भाऊ डांगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी सभापती खंडेराव जाधव,अँड.धैर्यशिल पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,उद्योगपती सुरेंद्र पाटील,महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आपल्या आरआयटी कॉलेजला अभिमित विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्या पदवीदान समारंभास आपण स्व.रतनजी टाटा यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. आम्ही त्यांना निमंत्रण द्यायला गेलो,त्यावेळी त्यांनी कॉलेज बद्दल अगदी शांतपणे सविस्तर माहिती घेऊन आपले निमंत्रण स्विकारले. आपल्या पदवी दान समारंभात त्यांनी अडीच तास उभा राहून सर्व ४०० विद्यार्थ्यांना पदवी दान केले. तसेच त्यांनी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालया स ८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मी त्यांना पत्र लिहून निधीची मागणी केली होती. त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागा कडून प्रस्ताव मागवून घेतला आणि तातडीने हा निधी दिला. या निधीमुळे उपजिल्हा रुग्णालय अद्यावत होऊन त्याचा आपल्या तालुक्यास परिसरास मोठा लाभ झाला. विशेषतः कोरोना काळात या रुग्णालयाने अनेकांचे प्राण वाचविले आहेत. त्यांनी टाटा समूह वाढविताना केवळ विस्तारवाढ,नफा वाढ हे ध्येय न ठेवता काही मूल्ये व सामाजिक बांधिलकी जपली आहे.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष अँड चिमणभाऊ डांगे यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी,संदीप पाटील,कृष्णेचे संचालक संजय पाटील,रोझा किणीकर, कमल पाटील,दिग्विजय पाटील,शैलेश पाटील,डॉ.संग्राम पाटील यांच्यासह समूहा तील अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ.पुष्पलता खरात यांनी आभार मानले.











































































