विजेचा जोराचा झटका लागल्यास बरेचदा व्यक्ती विजेच्या स्त्रोतालाच चिटकून राहते. सर्वप्रथम त्यांना विजेच्या स्त्रोतापासून दूर करा.यासाठी वीज पुरवठा खंडीत करून प्लग काढा.कारण बरेचदा बटण बंद करून वीज पुरवटा सुरू राहतो.हे शक्य नसल्यास, त्या व्यक्तीला थेट स्पर्श न करता एखाद्या कोरड्या वीज प्रतिरोधक वस्तूच्या सहाय्याने स्त्रोतापासून दूर करा. यासाठी त्या व्यक्तीकडे एखादे ब्लँकेट फेकता येईल किंवा लाकडाची काठी, लाकडी खुर्ची, स्टुलाचाही वापर करता येईल.
विजेच्या धक्क्याची तीव्रता
विजेच्या धक्क्याची तीव्रता बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते.
व्यक्तिपरत्वे शरीराकडून विजेच्या प्रवाहाला होणारा विरोध (रेझिस्टन्स) वेगवेगळा असतो. लहान मुलांच्या तुलनेत मोठ्या व्यक्तींचा बॉडी रेझिस्टन्स अधिक (साधारणपणे १००० ओहम्स) असतो.
त्वचेच्या ओलसरपणावरसुद्धा विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. कोरड्या त्वचेचा रेझिस्टन्स जास्त, तर ओलसर त्वचेचा रेझिस्टन्स कमी असतो; म्हणूनच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे किंवा स्विच चालू-बंद करणे टाळावे.
व्यक्तीचा जमिनीशी संपर्क आल्यामुळे विजेचा धक्का बसतो. पायात रबरी बूट, चप्पल घातलेल्या व्यक्तीचा विजेशी संपर्क आल्यास वीजप्रवाह जमिनीत जाऊ शकत नाही आणि शॉक बसत नाही; पण पाय जमिनीला टेकल्यास विजेचा धक्का बसतो; म्हणून विजेची कामे करताना हातात रबरी हातमोजे, पायात रबरी बूट घालावेत किंवा कोरड्या लाकडी पाटावर अथवा स्टुलावर उभे राहून काम करावे.
शरीरातून वाहणाऱ्या विजेचे प्रमाण आणि संपर्कांचा कालावधी यावरही विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. साधारणपणे ३० मिली अॅम्पियर एवढा वीजप्रवाह ३० मिलिसेकंद इतक्या कालावधीसाठी शरीरातून वाहिल्यास तो धोकादायक ठरू शकतो. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ईएलसीबी) यांसारखी उपकरणे घरात बसवल्यास शॉक बसण्याचा धोका पूर्णपणे टाळला जातो. व्यक्तीला शॉक बसताच ३० मिलिसेकंदात हा ‘ईएलसीबी’ विद्युत प्रवाह खंडित करतो आणि व्यक्ती पूर्ण सुरक्षित राहते.
प्रथमोपचार
भारतीय विद्युत नियमाप्रमाणे कारखान्यात किंवा कामाच्या जागी प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. या प्रथमोपचार पेटीत प्रथमोचारासाठी आवश्यक असणारी औषधे, बँडेज, कापूस, आयोडीन, बर्नोल यांसारखी मलमे इत्यादी साहित्य ठेवणे आवश्यक असते. ही प्रथमोपचारपेटी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवणेही गरजेचे आहे.
एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात येऊन शॉक बसल्यास सर्वप्रथम गळती असलेल्या वीज उपकरणाचा वीजपुरवठा बंद करावा किंवा मुख्य स्विच बंद करून टाकावा. प्लग सॉकेटमधून त्या उपकरणाचा पिन टॉपही काढून टाकावा. हे शक्य नसल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीने कोरड्या लाकडी फळीवर किंवा सहज उपलब्ध असलेल्या वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर उभे राहून, लाकडी काठीने शॉकबाधित व्यक्तीला विद्युत उपकरणापासून दूर करावे. विजेचा शॉक बसलेली व्यक्ती घाबरलेली असते. त्यामुळे अशा व्यक्तीला प्रथम मानसिक धीर द्यावा. त्यामुळे बाधित व्यक्ती प्रथमोपचारांना चांगला प्रतिसाद देते. अपघातग्रस्त व्यक्तीभोवती गर्दी व गोंगाट करू नये. त्या व्यक्तीचे कपडे सैल करावेत. दुखापतीमुळे रक्तप्रवाह येत असल्यास तो त्वरित बंद करण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूला कोणी नसल्यास मदतीसाठी कुणाला तरी बोलवावे. डॉक्टरांना फोन करून बोलावून घ्यावे.
कृत्रिम श्वासोच्छ्वास
विजेच्या तीव्र धक्क्याने बाधित व्यक्ती कधी कधी बेशुद्ध पडते. काही प्रसंगी त्या व्यक्तीचा श्वास बंद पडू लागतो. अशा वेळी अपघातग्रस्त व्यक्तीला कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छवास सुरू करण्याचा उपचार सुरू करणे आवश्यक असते. विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे, की नाही, हे छातीवर कान ठेवून, हृदयाचे ठोके ऐकणे, छातीची होणारी हालचाल, श्वासोच्छवासाचा आवाज ऐकणे, नाकासमोर बोट धरून श्वास तपासणे, अश्या सोप्या तपासण्या करूनसुद्धा समजू शकते. श्वासोच्छवास आणि हृदय बंद पडले असल्यास त्वरित कृत्रिम श्वासोच्छवासाचा प्राथमिक उपचार सुरू करावा. हे काम कोणताही सर्वसामान्य माणूसही करू शकतो आणि डॉक्टर येईपर्यंत त्याला पर्यायही नसतो.
वैद्यकीय मदत बोलवा
त्या व्यक्तीला तपासून गरज असल्यास लगेच रुग्ण वाहिकेला बोलावून घ्या. अन्यथा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.
ती व्यक्ती बेशुद्ध असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत तुम्ही त्यांना मदत करू शकता.
ती व्यक्ती श्वासोच्छ्वास करत नसेल वा धिम्या गतीने करत असेल, तर त्यांना सीपीआर अर्थात तुम्हाला याचे योग्य तंत्र अवगत असल्यासच देता येईल.
त्यांना झोपावून डोके शरीराच्या मानाने थोडे खालच्या दिशेने आणि पाय उंचावर ठेवा.
रुग्णाभोवती ब्लँकेट गुंडाळा.
रुग्णांची कमीत कमी हालचाल करा. विजेच्या झटक्यामुळे त्यांना आंतरित इजा झाली असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हालचालीमुळे गुंतागुंत वाढू शकते.
रुग्णाची त्वचा भाजली असल्यास जखमेवरील कपडे हळूवार काढा. (मात्र त्वचा कपड्यांनी चिकटली असल्यास असे मुळीच करू नका.)
भाजलेल्या जखमेवर थंड वाहते पाणी घाला. मात्र त्यावर बर्फ किंवा इतर कोणतेही मलम लावू नका. वैद्यकीय मदतीची वाट पहा.
सावधगिरी
विजेचा झटका लागलेली व्यक्ती विजेच्या संपर्कात असल्यास हाताने स्पर्श करू नका.
विजेचा प्रवाह बंद केल्याशिवाय अधिक व्हॉल्टेजच्या वायरच्या जवळपासही जाऊ नका.
वायरमधून ठिगण्या येत असल्यास किंवा ती हालत असल्यास त्यापासून किमान 20 फूट रहा.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.)