Last Updated on 16 Sep 2023 9:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती संभाजीनगर । सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी पदावर नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांना पुढील 5 वर्षांसाठी 85 हजार रुपये दर महाइतके सुधारित मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यासाठी येणाऱ्या वार्षिक 12.98 कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली.राज्यातील वरीष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना वेगवेगळे मानधन अदाकरण्यात येत असल्याने सदर मानधनातील तफावत दूर होण्यास यामुळे मदत होईल.
एकूण 1432 पदे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर नव्याने निर्माण करण्यास 6 जानेवारी 2023 रोजी मान्यता देण्यात आली होती.राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्स संवर्गातील एकूण मंजूर पदे आता त्यामुळे 2276 झाली आहेत.यामध्ये मराठवाड्यातील 483 पदे आहेत.
राज्यात एकूण 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून एकूण 17 संस्थामध्ये 25 हजार रुपये व त्यावर प्रचलित दराने देय होणारा महागाई भत्ता या दराने मानधन प्रस्तावित करण्यात आले आहे.उर्वरीत 6 महाविद्यालयांतील वरीष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना त्या त्या महाविद्यालयाच्या पदनिर्मितीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मानधन अदा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.











































































