Last Updated on 08 Sep 2023 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांचे आवाहन
मुंबई | ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदांतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी,फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.











































































