Last Updated on 19 May 2023 8:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महागाईमुळे शेतकरी अडचणीत; ‘स्वाभिमानी’ चा आंदोलनाचा इशारा
सांगली । यावर्षीचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटत आले आहेत.बहुतांश कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपयांच्या आसपास दिली आहे.आता खरिपाच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान प्रतिटन 500 रुपयांचा हप्ता द्यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले, आता साखरेचे दर प्रतिक्विटल 3500 रुपयांच्या घरात आहेत. इथेनॉलचा दर प्रतिलिटर 60 रुपयांच्या घरात आहे.को-जनरेशन प्रकल्पातून कारखान्यांचे उत्पन्न वाढले आहे.मोलॅसिस, दारू, मळी, बगॅस,प्रेसमड विक्रीतूनही कारखान्यांना पैसे मिळत आहेत.काही कारखान्यांनी जैविक खते,कंपोस्ट खते,गांडूळ खत निर्मिती,वर्मी वॉश आदी प्रकल्प सुरू केले आहेत.
मात्र,कारखानदार साखरेच्या दरावरच झुलवत ठेवत आहेत.रिकव्हरी पाडून,काटामारी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत.
कारखानदार गतवर्षीपेक्षा 100 ते 200 रुपये प्रतिटन जादा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.आता खरिपाच्या तोंडावर कारखानदारांनी किमान प्रतिटन 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जाधव यांनी दिला.











































































