क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांचे आवाहन
ठाणे | जीवनात विद्यार्थ्यांमध्ये शाररीक तंदुरुस्ती याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय खेळ प्राधिकरण, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय यांच्यामार्फत क्रीडा विषयक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्रालय व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फिट इंडिया ही प्रश्नमंजुषा तीन स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागासाठी स्तर-अ मध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शाळेतील केवळ 2 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. त्यासाठी www.fitindia.nta.aca.in या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्तर- ब मध्ये प्राथमिक फेरीच्या बॅचमध्ये मोबाईलवर आधारित चाचणी होईल . या चाचणीमध्ये 60 प्रश्न राहणार असून त्यांचा कालावधी 30 मिनिटांचा राहील. स्तर -क मध्ये डिसेंबर 2022 या महिन्यात राज्यातील विविध शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल . त्यामध्ये देशातील 36 राज्यातील गुणवंतांचा सहभाग राहील. त्यातून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी निवडला जाणार आहे. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रक्षेपित होणार आहे.
या स्पर्धेतील राष्ट्रीय विजेत्या शाळेकरीता रु.25 लाख व विद्यार्थ्यांकरीता रु.2.50 लाख, राष्ट्रीय उपविजेत्या शाळेकरीता रु.15 लाख व विद्यार्थ्यांकरीता रु. 1.50 लाख, राष्ट्रीय तृतीय क्रमांकाच्या शाळेला रु.10 लाख व विद्यार्थ्यांला 1 लाख रुपये मिळणार आहेत. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील प्रथम विजेत्या शाळेला रु. 2.50 लाख व विद्यार्थ्यांला रु. 25 हजार, द्वितीय क्रमांकाच्या शाळेला 1 लाख रु. व विद्यार्थ्यांला 10 हजार रु., तृतीय क्रमांकाच्या शाळेला 50 हजार रुपये व विद्यार्थ्यांला पाच हजार रुपये बक्षिस मिळणार आहे. याशिवाय इतरही बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या उपक्रमामध्ये शाळा आणि विद्यार्थ्यांना नोंदणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. शाळांनी www.fitindia.nta.aca.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घ्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय खेळ प्रधिकरणाचे सहायक संचालक सचिन घायाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) कार्यालयाने केले आहे.