गंडेदोरे,खडे,यंत्रे देणारे बाबा चर्चेत!
काही गजाआडही; तरीही नव्यांचा उदय!
सांगली | (टीम अधोरेखित)
देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात सक्रिय झाले आहेत. तथाकथित भोंदूबाबा भोळ्याभाबड्या जनतेबरोबरच सुशिक्षितांनाही गंडा घालण्याचे काम करत आहेत. गंडेदोरे, खडे, यंत्रे देणाऱ्या बाबांची सध्या चांगलीच चलती आहे. समाजसेवेचा ठेकाच आम्ही घेतला आहे. या अविर्भावात सध्या काही बाबा वावरत आहेत.’दुनिया झुकती है लेकिन झुकानेवाला चाहिये’ ही युक्ती या बुवांनी आत्मसात केली आहे. राज्यात काही भोंदूबाबा गजाआड गेल्याची उदाहरणेदेखील आहेत. तरीही रोज नव्या भोंदूबाबांचा उदय होताना दिसत आहे.
जीवनात सर्वसामान्य जनता वैफल्यग्रस्त झाल्याची नस पकडत व मूलबाळ होत नाही,कोर्टकचेऱ्या तसेच अन्य कारणांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना फसवून भोंदूबाबा त्यांच्याकडून हजारो रुपयांची लूट करत आहेत. राज्यातील महत्वाच्या देवस्थानाचा व देवाच्या नावाचा आश्रय घेत या बाबांनी आपला धंदा सुरू ठेवला आहे.यामध्ये होम-हवन,गंडेदोरे तसेच आघोरी साधनेचे प्रयोग करून संबंधिताला अक्षरशः मेटाकुटीला आणत आहेत. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न सुरू असतानाही राज्यातील जनता ही श्रद्धाळू आहे हे त्या बाबांनी ओळखल्यामुळे अशा भोंदूबाबाचा सुळसुळाट वाढला आहे.प्रेमात यश मिळवून देण्यापासून ते अगदी महाभयंकर रोग बरा करण्याचा या बुवांकडे उपाय,औषध असते.यांच्याकडे उपाय काय तर, तीन शिराचा लिंबू,घरात मंतरलेला नारळ आणि ठराविक रकमेचा होम.हा आकडा हजारो रुपयांचा असतो.
होम करण्यासाठी एखाद्याने नकार दिला तर पुढच्या वाईट परिस्थितीतून तुम्ही सुटणार नाही अशी भीती असतेच.त्यामुळे होम करण्याकडे अंधश्रद्धाळू पटकन वळतात.समाजसेवेचा ठेकाच आम्ही घेतला आहे,या अविर्भावात सध्या काही बाबा वावरत आहेत.राज्यात सर्वसामान्य भोळ्याभाबड्या जनतेबरोबर सुशिक्षित लोकांनाही या भोंदूबाबाने आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे.विज्ञानाला आव्हान देण्याचे काम या भोंदूबाबांनी हाती घेतल्याचे चित्र आहे.‘दुनिया झुकती है लेकिन झुकानेवाला चाहिये’ ही युक्ती या बुवांनी आत्मसात केली आहे.या भोंदूबाबांच्या अघोरी कारनाम्यांमुळे दररोज शेकडो निष्पाप मुक्या जीवांना आपला प्राण गमवावा लागत आहे.
अनेक अडचणींवर उपाय सांगण्यासाठी उरपाट्या पकाची कोंबडी अथवा बोकड द्यावे लागते.भोंदूबाबांकडून होणाऱ्या उपायांमध्ये पाण्यात घालून अंगारा पिणे,अमावस्या-पौर्णिमेला मध्यरात्री स्मशानात जाऊन तेथील रक्षा शरीराला लावून तर कधी शिष्याला नारळावरती बसून काहीजण फिरवत आहेत.ते फिरत असताना भक्तगण कधी गुरफटले जातात याचे भानही भक्तांना राहत नाही.आपली फसवणूक झाल्याचे कळूनसुद्धा लोकांकडे हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नसतो.तोपर्यंत भोंदू महाराजांनी त्यांच्याकडून हजारोंचा मलिदा उकळलेला असतो.काही महाभाग व्यवसायात अपयश आल्यानंतर आता आपली काहीच मात्रा चालत नाही हे लक्षात येताच भोंदूगिरी करण्याकडे वळतात.काही मंत्र-तंत्र,जादूटोणा विद्या शिकले अन महाराज झाल्याची उदाहरणे आपल्या आसपासही आहेत.स्वतः व्यवसायात अपयशी ठरले,पण दुसऱ्याला व्यवसायात यशप्राप्तीची विद्या देण्याचे धडे देत आहेत,हे आणखी विशेष ! अशांनी मठ स्थापन करून भोंदूगिरीचा बाजार मंडळाची दिसते.आज हेच महाराज लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन खुलेआम फिरताना दिसतात.राज्यातील काही भोंदूबाबा हे लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना श्री यंत्रे,अंगठ्या,खडे देण्याचे प्रकारही वाढले आहेत.लोकांच्या श्रध्देचा गैफायदा शंभर रुपयाला मिळणारे यंत्र हजार-दोन हजार रुपयाला विकले जात आहे पाचशे रुपयांचा खडा पाच-दहा हजारांवर विकला जात आहे.भोंदूबाबांकडून लग्न जमविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे.राज्यात काही भोंदूबाबा गजाआड गेल्याची उदाहरणेदेखील आहेत.तरीही रोज नव्या भोंदूबाबांचा उदय होताना दिसत आहे.याला काही अंशी राजकारणीही जबाबदार आहेत.राजकारणात यश मिळण्यासाठी काही राजकारणी अशा बाबांच्या नदी लागतात. याचाच गैरफायदा असे भोंदूबाबा उचलताना दिसत आहे.
राज्याला संत,साहित्यिकांची मोठी परंपरा आहे.पुरोगामी विचारसरणीच्या नेतेमंडळीची येथे वानवा नाही.कर्मवीर अण्णांसारख्या अनेक थोर विभूती या राज्याने देशाला दिल्या.पुरोगामी आणि आधुनिक राज्य म्हणून देशात पुढे आहे.याच राज्यातील जनता अंधश्रद्धेच्या जात्यात भरडली जात आहे,हेही वास्तव नाकारता येत नाही.पुरोगामी आणि आधुनिक विचारांच्या राज्याला ही बाब निश्चितच भूषणावह नाही.अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.परंतु समाजातील काही प्रवृत्ती अशा प्रयत्नांना दाद देताना दिसत नाहीत.भोंदूबाबांविरोधात जनतेनेच आता पुढे येण्याची गरज आहे.अंधश्रद्धेची ही जळमटे फेकून देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
भोंदूबाबांना बळी पडणे हे कुठेतरी थांबले पाहिजे.समाजाला लागलेली ही कीड संपली पाहिजे.मेहनत परिश्रम केल्याशिवाय काही मिळत नाही.घरच्या देवाच्या पाया पडा,नामस्मरण करा.आई-वडिलांची सेवा करा.फक्त देव-देव करून घरदारावर पाणी सोडून काहीच कुणाचे भले झालेले नाही.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतात,संकटे येतात,पण त्यावर मात करण्याची हिम्मत ठेवायला हवी.वेळप्रसंगी प्रवाहाविरुद्ध लढायची हिम्मत ठेवली पाहिजे.कुणी सदा सर्वसुखी नसतोच.पैसा असूनही माणसाला झोप लागत नाही आणि गरिबीतून पैशाची चणचण असते,म्हणूनही झोप नसते,पण संयम असावा लागतो. आपल्या मेहनतीवर स्वत:ची श्रद्धा हवी.तुम्ही केलेल्या प्रत्येक सत्कर्मात देवाची साथ असते.स्वत:मध्ये देव शोधला पाहिजे,मग असल्या भोंदूबाबांकडे जायची गरज लागणार नाही.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत