कोल्हापूर | आयुष्यात यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असा प्रेरणादायी मंत्र स्पर्धा परीक्षेतून आयपीएस झालेले अधिकारी बिरदेव डोणे यांनी युवकांना दिला. जिल्हा प्रशासन आणि सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ झाला. प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्राचार्या डॉ. बी. एन. मेनन, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरदेव डोणे यांनी सांगितले की, परीक्षेच्या कालावधीत केलेल्या अभ्यासापेक्षा वर्षभर सातत्याने केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो. अपयशाला घाबरू नका, आत्महत्या सारखे चुकीचे निर्णय टाळा आणि कुटुंबाकडून प्रेरणा घ्या, असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आईला आपले आदर्श मानले. आपल्या घरातील पहिली शिकलेली पिढी असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी महत्त्वाची नसून मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अभ्यासाचे नियोजन करताना गुणवत्तेवर लक्ष द्या, कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवा, प्रश्नपत्रिका पूर्ण लिहिणे ही पहिली पायरी आहे, सामाजिक माध्यमांवरील जाहिराती तपासून योग्य मार्गदर्शक निवडा, इंग्रजीची भीती बाळगू नका कारण प्रशासनात स्थानिक भाषेतच काम करावे लागते, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
आपले छंद आणि अनुभव आत्मविश्वासाने सांगण्याचा सल्ला देत मॉक इंटरव्ह्यूमध्ये नैसर्गिक उत्तरे देण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यूपीएससीच्या पुढील प्रयत्नांसाठीही आपण तयारी करत असल्याचे सांगत प्रामाणिक प्रयत्न आणि दृढ विश्वास यश मिळवून देतो, असे त्यांनी नमूद केले. सीबीएससी, एनसीआरटी पुस्तके, टॉपर्सचे व्हिडीओ आणि यूपीएससीच्या भाषेचा अभ्यास यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. यशस्वी होण्यासाठी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास हाच खरा शॉर्टकट असल्याचेही ते म्हणाले. डॉ.कुलकर्णी यांनी शेवटी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.