‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन मांडतात.
हे अरिष्ट केवळ व्यक्तिगत आयुष्यात वादळे उठवण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून ते लोकजीवनाचे सामाजिक आणि राजकीय अंग छेदत खूप खोलवर शिरत असल्याचे संकेत या कवितेत आहेत.अफवा,संभ्रम, संशय, भीती, मुस्कटदाबी या गोष्टींचा धूर्तपणे वापर करीत चालून येणारे हे अरिष्ट पाशवी बहुमताच्या जोरावर समताधिष्ठित मानवी जीवनशैलीवर आघात करीत प्रसंगी संविधानाच्या गाभ्याला नख लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा गंभीर इशारा ही कविता देते. समाजातील संवेदनशील सहिष्णू माणसं, सत्तेला जाब विचारणारे लेखक तसेच समतेसाठी लढणारे कार्यकर्ते पत्करत असलेली जोखीम या कवितेत अधोरेखित झालेली आहे.माणसाच्या अभिव्यक्तीला कुंपण घालण्यासोबतच त्याच्या मेंदूचादेखील ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांकडे निर्देश करीत ही कविता आजच्या संभ्रमित काळाचे स्वरूप स्पष्ट करते.
एका बाजूला गोतावळा, गावगाडा, कुणबिकी यात गुंतलेली मुळं तर दुसऱ्या बाजूला फक्त वावरातच नव्हे, तर मेंदूतही माजलेला कुंधा अशा दुहेरी पेचात अडकलेल्या मनाची तगमग या कवितेतून परिणामकारकरीत्या अभिव्यक्त झाली आहे.व्यक्तिगत जगण्यातला ताण मानवी जीवनातील कोलाहलापर्यंत विस्तारत नेणारी ही कविता आजच्या जटिल काळाचे अनेक संदर्भ घेत त्यातले बहुविध पेच उलगडण्याचा प्रयत्न करीत संथपणे वाचकाला अंतर्मुख आणि अस्वस्थ करते.
प्रफुल्ल शिलेदार
ललित पब्लिकेशनचा नवा कवितासंग्रह
अरिष्टकाळाचे भयसूचन
एकनाथ पाटील
पृष्ठे : १३०
किंमत : ₹ २००/-
घरपोच – 180/-
मुखपृष्ठ : प्रशीक पाटील/ इस्लामपूर
ग्राफिक्स : गणेश पोतदार
सुलेखन : बुद्धभूषण साळवे
पाठराखण : प्रफुल्ल शिलेदार
—————————————-
संपर्क
संवाद ग्रंथ वितरण
8879039143