Last Updated on 18 Aug 2024 3:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना वाढती मागणी
मूर्तिकार नारायण कुंभार हे दरवर्षी तयार करतात ४०० ते ५०० शाडूच्या गणेश मूर्ती
शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची संख्या अगदी मर्यादित
शाडूची माती मिळणे दुर्मिळ झाले
शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल
विविध अंगानी पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.पारंपरिक सणांतूनही यामध्ये भर पडत आहे.गणेश मूर्तीपासून निर्माल्यापर्यंत प्रश्न निर्माण होत आहेत . पण,बहे-इस्लामपूर येथील मूर्तिकार नारायण कुंभार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ गणेश मूर्ती बनवून वेगळेपण दाखवले आहे.मुळचे बहे येथील पण,व्यावसायानिमित्त इस्लामपूर येथील महादेवनगरमध्ये स्थायिक झालेले नारायण कुंभार हे प्रत्येकवर्षी शाडूच्या गणेश मूर्ती तयार करतात.

पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असताना गणेश उत्सवात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापणेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.शाडूची माती मिळणे दुर्मिळ झाले आहे.राज्यात कोल्हापूर,इस्लामपुर,तसेच बहेसह अन्य काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
कारण शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची संख्या अगदी मर्यादित आहे.आणि शाडूची माती ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या शेणगाव तसेच अन्य काही मोजक्या भागातच उपलब्ध होते.ही गौण खनिज संपत्ती आता दुर्मिळ होत चालल्याने तिचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढले असून शाडूची माती गणेश मूर्ती बनविण्यासाठी तयार करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये उत्तम प्रतिचा कापूस घालून लाकडाच्या मुंगलीने त्याचा एकजीव करावा लागतो.मग अतिश्रमानंतर ती शाडू माती गणेश मूर्ती तयार करण्यासाठी योग्य होते.आणि शाडूपासून एक दीड फुटी गणेशमूर्ती तयार करण्यास किमान पाच ते सहा तास वेळ द्यावा लागतो.तर याउलट चार तासात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या २० हुन अधिक गणेश मूर्ती तयार होतात.
या मूर्तीना वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक व केमिकल विरहित असल्याने विसर्जनानंतर शाडूच्या मूर्ती बरोबरच रंगही जलाशयात विरघळत असल्याने यापासून जल प्रदुषण होत नाही.पीओपीच्या गणेशमूर्ती या विसर्जनानंतर महिना-महिना पाण्यात तशाच उभ्या असतात,आणि त्याला आकर्षक दिसण्यासाठी दिलेले केमिकल पासून बनविलेले रंगही जल प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

इस्लामपुरचे मूर्तिकार नारायण कुंभार हे प्रत्येक वर्षी ४०० ते ५०० शाडूच्या गणेश मूर्ती तयार करतात.सध्या मूर्ती तयार असून रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. कोरोनाचे संकट असतानादेखील शाडूच्या मूर्तीना वाढती मागणी आहे.ही मागणी लक्षात घेऊन पुढील वर्षांपासून शाडूच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभार गेली ४०- ४५ वर्षांपासून केवळ शाडूच्याच मूर्ती बनवित आहोत.६ इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या उंचीच्या गणेशमूर्ती ते बनवतात.साधारणपणे एका लहान गणेश मूर्तीसाठी १ किलो शाडूचा वापर करावा लागतो
दुर्मिळ होत चाललेली शाडूची माती,त्यासाठी करावे लागणारे परिश्रम,द्यावा लागणारा वेळ,शाडू मातीची आणि रंगांची किंमत वाढली असली तरीही यावेळी कोणतीही दरवाढ न करता कोरोना महामारीच्या लॉकडाउनच्या काळात गेल्यावर्षीच्या दरातच गणेशमूर्ती उपलब्ध असणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तीमुळे होणारे वाढते जलप्रदूषण थांबविण्यासाठी शाडूच्या गणेश मूर्तीला चांगलेच महत्व प्राप्त झाले असून शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे.मागणी वाढत असली तरी शाडूची दुर्मिळता आणि द्यावा लागणारा वेळ तसेच परिश्रम परिणामस्वरूप शाडूपासून गणेश मूर्ती तयार करण्याची ग्राहकांची मागणी मूर्तिकार पूर्ण करू शकत नसल्याबद्दल मूर्तीकार कुंभार यांनी खंत व्यक्त केली.
कुंभार यांना गणेशमूर्ती तयार करणे,रंगकाम करणे आदी कामात त्यांच्या पत्नी उमाताई,मुलगा प्रवीण,सून सौ.सारिका,त्यांची इयत्ता दुसरीत असणारी मुलगी श्रावणी हेदेखील मदत करत असतात.
डॉ.विशाल कुंभार यांनीही बनवल्या गणेशमूर्ती
इस्लामपूर येथील निनाईनगरमधील डॉ.विशाल सतीश कुंभार हेही आपले पशुवैद्यकीय काम पाहत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करत आहेत.शाडूपासून गणेशमूर्ती बनविण्याची कला ते नारायण कुंभार यांच्याकडून शिकले.त्यांनीही आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनवल्या आहेत.











































































