ऊसदरप्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला ‘स्वाभिमानी’चे निवेदन; 10 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टीमेटम
सांगली । राज्यात उसाच्या चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवरच ऊस दराचे आंदोलन चांगलेच पेटणार असे दिसत आहे. प्रति टन ऊसाला विना कपात ३ हजार ७५१ रुपये दर आणि मागील हंगामातील २०० रुपये हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर .डी. माहुली यांना देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या २४व्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात साखरेचा दर ₹३८०० प्रति क्विंटलपर्यंत गेला असून, इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळणे ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, असे संघटनेने ठामपणे नमूद केले.
तसेच २५ किलोमीटरपर्यंतच वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि “२५ किमी क्षेत्रासाठी ₹७५० कपात मान्य, त्यापलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये,” अशी मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी संघटनेने 10 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम देत त्यानंतर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी महेश खराडे, सूर्यकांत मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय बेले, जगन्नाथ भोसले, ऍड. समशुद्दीन संदे, भास्कर कदम, बाबा सांद्रे, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, प्रकाश देसाई, प्रभाकर पाटील, विलास पाटील, प्रवीण पाटील, पांडुरंग शिसाळे, शहाजी पाटील, पंढरीनाथ संकपाळ, शामराव जाधव, बाळासाहेब शिंदे, शिवाजी पाटील, प्रदीप पाटील, सर्जेराव पाटील, संपतराव भोसले, प्रताप पाटील, मनोहर पाटील, नंदकुमार पाटील, रोहित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१० नोव्हेंबरचा अल्टीमेटम
१० नोव्हेंबर च्या आत ऊस दराचा तोडगा जाहीर करा, अन्यथा कारखानदाराच्या विरोधात ऊसतोड बंद, ट्रॅक्टर बंद आंदोलन करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था यांची जबाबदारी सर्वस्वी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची राहील.
भागवत जाधव
नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
 
                                                                     
								












































































