आ. जयंत पाटील यांच्याकडून उमेदवारीची घोषणा; राष्ट्रवादीत उत्साहाचं वातावरण
सांगली । उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये ही उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांच्या निनादात मलगुंडे दादांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,लोकनेते राजारामबापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील,पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळा व प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,आनंदराव मलगुंडे हे अजात शत्रू,मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिके तील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी स्व.बापूंना मोठी साथ दिली आहे. आपल्या पक्षाने १९८५ साली ३१ पैकी २९ जागा जिंकून नगरपालिकेची सत्ता मिळविली होती. त्यानंतर आपण ३१ वर्षे या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली. यामध्ये दादांचा वाटा मोठा आहे. येत्या ४-६ दिवसात निवडणूका जाहीर होतील,कामाला लागा. गेल्या ९ वर्षात या शहरात काय विकास झाला? चालू होती,ती कामे बंद कशी पडली? हे जनतेला सांगा,जनता निश्चित साथ देईल.

इस्लामपूर : येथे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचा सत्कार करताना माजी मंत्री आ.जयंत पाटील. समवेत प्रा.शामराव पाटील, शहाजी पाटील, अरुणादेवी पाटील, पुष्पलता खरात
शहाजी पाटील म्हणाले,पक्षाचे राज्य सरचिटणीस रविंद्र पवार यांनी मलगुंडे दादांच्या उमेदवारास मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीचे उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक कार्यकर्त्यांनी हे अर्ज घेऊन चार दिवसात भरून द्यावेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी उमेदवारीबद्दल कृतज्ञता व्यक्त नेते व संघटनेचा विश्वास सार्थ करू,असा विश्वास व्यक्त केला.
प्रा.शामराव पाटील,खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील,सुरेंद्रदादा पाटील, सुभाषराव सुर्यवंशी,दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील,अँड.धैर्यशिल पाटील, संदीप पाटील,पिरअली पुणेकर,अरुण कांबळे,शंकरराव चव्हाण,रोझा किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव, संजय पाटील,संग्राम जाधव,दिग्विजय पाटील,सचिन कोळी,स्वरूप मोरे यांच्यासह जेष्ठ,युवक,महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी आभार मानले.
 
                                                                     
							












































































