जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला नियोजनाचा आढावा
2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा
स्पर्धांचे दर्जेदार आयोजन करण्याच्या सूचना
सांगली । क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या पत्रानुसार 19 वर्षाआतील मुली या वयोगटाच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा व 19 वर्षाआतील मुले व मुली या वयोगटाच्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. व्हॉलिबॉल स्पर्धांचे आयोजन दि. 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, स्पर्धांचे आयोजन दर्जेदार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उप शिक्षणाधिकारी नागेश ठोंबरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दोन्ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने संपूर्ण स्पर्धेचे नियोजन राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर करावे. स्पर्धेसाठी क्रीडांगण सुसज्ज असावे. क्रीडांगणावर वीजव्यवस्था, बॅरिकेटस्, स्टेज, मंडप, ध्वनीक्षेपक आदिंची योग्य ती व्यवस्था करावी. पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यात यावे. प्राथमिक उपचार व्यवस्था उपलब्ध ठेवावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्यातील आठ विभागांचे आठ संघातील खेळाडु, निवड चाचणीसाठी खेळाडु, संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, निवड समिती सदस्य, स्वयंसेवक अशा जवळपास 197 व्यक्ति राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत व जवळपास 91 व्यक्ति मल्लखांब स्पर्धेत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडु व संघ, पंच, व्यवस्थापक, मार्गदर्शक यांच्यासाठी भोजन, निवास यासह आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. कोणताही गैरप्रकार होणार नाही, असुविधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
यावेळी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल, मल्लखांब स्पर्धांच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असलेल्या पूर्वनियोजनाची माहिती दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रास्ताविक केले व बैठकीनंतर उपस्थितांचे आभार मानले.
जिल्हा क्रीडा संकुल समितीचाही घेतला आढावा
दरम्यान, यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचाही आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे बुद्धिबळ भवन निर्माण करणे, लॉन टेनिस कोर्ट भाडे तत्त्वावर चालवण्यास देणे, जलतरण तलाव दुरूस्ती आदि विषयांवर चर्चा करण्या आली. तसेच, सुधारित शासन निर्णयाप्रमाणे या समितीचे अध्यक्ष म्हणून आता जिल्हाधिकारी काम पाहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
                                                                     
							












































































