पुणे । “भाकरीचा घास आणि मायेचा सुवास…चळवळीचं खरं रूप हेच आहे,” असं सांगत माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक अनुभव शेअर केला आहे.
मुंबईहून पुणे जिल्ह्यातील नारायणगावकडे जात असताना, चाकण विभागातील काळूस गावचे चळवळीतील सहकारी सुभाष पावले, विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल आणि भरत आरगडे, तसेच रामदास वाटेकर यांनी त्यांची भेट घेतली. दौऱ्याच्या धावपळीतही या भेटीने खोत भावूक झाले. सहकाऱ्यांनी घरातून खास ज्वारी-बाजरीची भाकरी आणि लाल मिरचीचा ठेचा आणला होता. “भाऊ, आमच्या घरातून बनवून खास तुमच्यासाठी आणलंय,” असं म्हणत त्यांनी ती भाकरी समोर ठेवली.
“त्या भाकरीचा घास घेताना जाणवलं…ही चळवळ केवळ विचारांची नाही, तर हृदयांना जोडणारी आहे. राज्यभर पसरलेल्या मायेच्या, निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या स्नेहबंधनामुळे ही चळवळ जिवंत आहे,” असं खोत यांनी नमूद केलं.
शरद जोशींच्या ड्रायव्हरचा मुलगा अभिमन्यू शेलार दीड तास त्यांची वाट पाहत होता. भेटल्यावर त्याने दिवाळीचा फराळ हातात देत म्हटलं, “भाऊ, हा फराळ आपल्या घरचा आहे, तुम्ही आमच्यासाठी घरच्यांसारखे आहात.”
“तो माझ्या घरात आलेला पहिला दिवाळी फराळ होता, आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यांत खरंच पाणी आलं,” असं खोत म्हणाले.
त्यांनी शेवटी लिहिलं —
“चळवळ ही फक्त संघर्षाची नाही, ती प्रेम, नात्यांची आणि माणुसकीची पायवाट आहे.”
 
                                                                     
							












































































