पुणे । अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा” या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. कारवाईदरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, बटर व वनस्पती, भगर आदी अन्न् पदार्थाचे एकूण ६५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते, त्यापैकी २१६ अन्न् नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून १९० प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप, व १३ असुरक्षित नमुने आढळले आहेत. दोषी नमुन्यांवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याबाबत शंका असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे केले आहे.
 
                                                                     
							












































































