पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडयात घेण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 पर्यंत चालतील. यासोबतच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 9 फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि ऑनलाइन परीक्षा देखील याच कालावधीत होतील.
10 वीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील आणि 18 मार्च 2026 रोजी संपतील. शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि गृहविज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान घेतल्या जातील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील या वेळापत्रकात समाविष्ट आहेत.

सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार
 
                                                                     
							












































































