नवी दिल्ली । नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) या पदाचा कार्यभार भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी आज मुंबई येथे स्वीकारला. महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांच्या कालावधीकरिता श्री. गायकवाड यांची या पदी प्रतिनियुक्ती केली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे मूळ निवासी असलेले श्री. गायकवाड हे 1998 बॅचचे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (IRTS) अधिकारी आहेत. यापूर्वी ते केंद्र सरकारच्या संरक्षण राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत होते. आता पर्यंत त्यांनी रेल्वे, सरंक्षण, वस्त्रोद्योग, पर्यटन आणि आयुष या मंत्रालयात कार्य केलेले आहे. विविध सरकारी सार्वजनिक उपक्रमावर, स्वायत्त संस्था, निर्यात प्रोत्साहन परिषद, यावर कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
रेल्वे विभागात त्यांनी बेंगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथे विविध उच्च पदांवर आपली सेवा बजावली आहे. रेल्वेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांची निवड संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी परिषद’च्या (FAO) हार्ड फायबर आंतरराष्ट्रीय गटावर उपाध्यक्ष म्हणून झाली होती. या भूमिकेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे.
सरंक्षण मंत्रालयात, कार्यकारी संचालक या पदावर कार्य करताना, ऑपरेशन सिंधुर मध्ये केलेल्या योगदाना बाबत, भारतीय लश्कर प्रमुखांचे कमेंडेशन पदक नुकतेच जाहीर झाले होते, तसेच यापूर्वी देखील त्यांना चीफ ऑफ डिफेन्स (सीडीएस) यांचे कमेंडेशन पदकाने गौरवण्यात आले होते.
प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच श्री. गायकवाड यांना मराठी साहित्याचे विपुल वाचन आणि विशेष प्रेम आहे. त्यांनी “झेंगट” या कादंबरीचे लेखन केले आहे, या व्यतिरिक्त त्यांचे काही लेख नियतकालिकांतूनही प्रकाशित झाले आहेत. प्रवास, ट्रेकिंग आणि छायाचित्रकारिता हे त्यांचे विशेष छंद आहेत.
दिल्ली स्थित मराठी अधिकारयांची “पुढच पाऊल” या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि गेल्या काही काळापासून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला, संस्कृती तसेच राज्याच्या विविध विषया संदर्भात दिल्ली मध्ये नियमित कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
 
                                                                     
							












































































