नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे,
14 नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत, सध्या सुरू असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ हा 22 नोव्हेंबरला संपणार आहे,
पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. बिहार निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 17 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 20 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल. अर्जांची छाननी ही 18 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 21 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि 23 ऑक्टोबर (दुसरा टप्पा) असेल.
बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत, त्यापैकी 203 जागा या सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत, तर एससी साठी 38 आणि एसटी साठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील.
 
                                                                     
							












































































