सांगली । संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय बहे सर्व सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डांगबाबा शिंदे हे अध्यक्षस्थानी होते.
बहे येथील सर्व सेवा सहकारी संस्थेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन एकमताने विषय मंजूर करण्यात आले.तसेच सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
सभासदांच्या मागणीनुसार सोलर सिस्टीम बसवणे, थकीत कर्ज वसुली व त्यामळे अन्य सभासदांचे होणारे नुकसान तसेच सामान्य कर्ज वाटप गृह कर्ज आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष डांगबाबा शिंदे यांनी केले.सचिव सुधाकर मोहिते यांनी विषय वाचन केले.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथ श्रीपती पाटील यांच्या फोटोचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डांगबाबा शिंदे व माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जयदीप पाटील यांनी कर्ज वसुली व थकबाकी संदर्भात भूमिका मांडली. ते म्हणाले, संचालक मंडळाने वसुलीच्या बाबतीत सभासदांना विश्वासात घेऊन तसेच काहीवेळा कठोर भूमिका घेतल्यामुळे कारखान्यांकडून गेल्या दिड महिन्यात कोणताही वसूल नसताना थकबाकीदार सभासदांनी आपली थकीत रक्कम ६० लाख रुपये रोख स्वरूपात भरले. यापुढील काळातही सभासदांच्या हितासाठी सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. उर्वरित कर्जदारांनी आपलें कर्ज वेळेत भरून संस्थेच्या उज्वल भवितव्यासाठी सहकार्य करावे.
यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखाने संचालक अविनाश खरात, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील, राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे माजी संचालक बाबुराव हुबाले, बहे सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव पाटील, हणमंतराव पाटील तसेच उद्योजक प्रसाद पाटील,अजित थोरात, मानसिंग पाटील, शहाजी पाटील आणि संस्थेचे बहे, हुबालवाडी, खरातवाडीचे सर्व सभासद, माजी चेअरमन, आजी-माजी संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.