नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री.रवींद्र बिनवडे यांची माहिती
पुणे । ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री. रवींद्र बिनवडे यांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) श्री. उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. बिनवडे म्हणाले, नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रथम विक्री करारनामा प्रक्रियेसाठी नागरिकांनी नोंदणी कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सन २०२०-२१ पासून ही सुविधा सुरू केली आहे व यासाठी नोंदणी अधिनियम १९०८ आणि महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन नियम २०१३ अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे.
ई-एसबीटीआर हा मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचा कायदेशीर व सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये डुप्लीकेशन व अन्य गैरप्रकारांना वाव राहणार नसल्याने त्याची विश्वासार्हता आहे. ई-एसबीटीआर या उपक्रमाची सन २०२४ पासून अंमलबजावणी सुरु असून अद्यापपर्यंत यामध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही.
ई-एसबीटीआरवर मुद्रित केलेले, डिजिटली स्वाक्षरी असलेले व ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदणीकृत केलेले दस्त हे मूळ दस्त म्हणून ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे हे दस्त बँकांनी कर्जविषयक अथवा इतर कामकाजासाठी मूळ दस्त म्हणून ग्राह्य समजण्यात यावे, अशी सूचना श्री. बिनवडे यांनी केली.