मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील गावे व तालुक्यांचा परस्परांशी संपर्क तुटलेला असून उमेदवारांना प्रवास व केंद्रांवर पोहोचणे कठीण होण्याची शक्यता आहे. कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने परीक्षा पुढे ढकलण्यास शासनाने कळविल्याने आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, परीक्षेसंबंधी अद्ययावत माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या शुद्धिपत्रकाचे अवलोकन करावे.