सातारा । देशपातळीवर साखर उद्योग क्षेत्रामध्ये तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करणारी दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाने य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांना जीवन गौरव 2025′ हा मानाचा पुरस्कार नुकताच प्रदान केला.
पुणे येथे जे डब्ल्यू मॅरीयट या पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी साखर उद्योगातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बाजीराव सुतार यांचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, माननीय संचालक मंडळातील सर्व सदस्य,सभासद बंधू भगिनी, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३९ वर्षाच्या कामगिरीची दखल
सहकार कारखानदारीत बाजीराव सुतार यांचे 39 वर्षाचे सलग योगदान आहे. प्रशासकीय कामकाज, आर्थिक शिस्त, तांत्रिक गुणवत्ता व पारदर्शक कारभार यावर त्यांचा साखर कारखानदारीतील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी त्यांनी विविध साखर कारखान्यांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांना सहकार भूषण २०१३, एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज इन इंडिया २०२५ चा दिल्ली येथे चिनी मंडी यांचे मार्फत अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे.