नवी दिल्ली । महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त 25 लाख एल पी जी जोडण्या जारी करायला मंजुरी दिली आहे. याप्रसंगी या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे “नवरात्रीच्या मंगल प्रसंगी मी उज्ज्वला कुटुंबात सहभागी असलेल्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा देतो. आम्ही उचललेल्या या पावलामुळे या पवित्र सणाच्या काळात त्यांचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या आपल्या दृढसंकल्पाला अधिक बळकटी मिळेल.”
याआधी या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “नवरात्रीच्या शुभपर्वावर उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख ठेव- मुक्त एल पी जी जोडण्या पुरवण्याच्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांना श्री दुर्गा मातेसमान आदर देण्याची वचनबद्धता दिसून येते.” यामुळे माता आणि भगिनींच्या सन्मानाप्रती तसेच महिला सक्षमीकरणासाठीचा आपला निर्धार अधिक मजबूत होतो. स्वयंपाकघराचे परिवर्तन, आरोग्याचे रक्षण आणि देशभरातील कुटुंबांचे भविष्य उजळवणारी उज्ज्वला योजना ही भारतातील सर्वात प्रभावशाली कल्याणकारी योजना म्हणून उदयाला आली आहे .
या विस्तारासह, पीएमयूवाय जोडण्यांची एकूण संख्या 10.58 कोटी होईल. या जोडण्यांच्या वितरणासाठी केंद्र सरकारने 676 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन 2,050 रुपये या दराने 25 लाख ठेव-मुक्त जोडण्या प्रदान करण्यासाठी 512.5 कोटी रुपये , प्रति 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी 300 रुपयांच्या लक्ष्यित अनुदानासाठी 160 कोटी रुपये (दर वर्षी नऊ रिफिलसाठी, 5 किलो च्या सिलेंडरच्या प्रमाणानुसार) आणि प्रकल्प व्यवस्थापन खर्च, व्यवहार आणि एसएमएस शुल्क, माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रम आणि प्रशासकीय खर्चासाठी 3.5 कोटी रुपयांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी, लाभार्थी अधिकृत PMUY पोर्टल www.pmuy.gov.in ला भेट देऊ शकतात किंवा सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या त्यांच्या जवळच्या एलपीजी वितरकाशी संपर्क साधू शकतात.