एक अनोखा खगोलीय अविष्कार रविवारी रात्रीच्या आकाशामध्ये तमाम भारतीयांना पहायला मिळणार
ग्रहणे अनुभवण्यासाठी व अभ्यासासाठी असतात, अंधश्रद्धेसाठी नाहीत
सांगली । खग्रास चंद्रग्रहणासारखा एक अनोखा खगोलीय अविष्कार रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या आकाशामध्ये तमाम भारतीयांना पहायला मिळणार आहे. ग्रहणे हे पाळण्यासाठी नसून अनुभवण्यासाठी व अभ्यासण्यासाठी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ग्रहण आणि त्यासंबधी अंधश्रद्धा याबद्दल सातत्याने प्रबोधन व कृती कार्यक्रम केले आहेत. या वेळच्या चंद्रग्रहणाचे सर्वांनी निरीक्षण करावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.
या वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. खंडग्रास चंद्रग्रहण रात्री ९:५७ वाजता सुरु होत असून दि. ८ सप्टेंबरच्या रात्री १:२६ वाजता समाप्त होईल. तसेच खग्रास चंद्रग्रहण रात्री ११ वाजता सुरु होत असून दि. ८ सप्टेंबरच्या रात्री १२:२२ वाजता समाप्त होईल. खंडग्रास स्थितीमध्ये चंद्राचा काही भाग झाकला जाणार असून खग्रास स्थितीमध्ये चंद्राचा पूर्ण भाग झाकला जाणार आहे. अस असलं तरी खग्रास स्थितीमध्ये चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे, त्याला रेड मून म्हणतात. याला पृथ्वीभोवती असलेले वातावरण कारणीभूत आहे. चंद्रग्रहण हा केवळ सावल्यांचा खेळ आहे. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहणाचा नजारा पाहायला मिळतो. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पहिले तरी ते धोकादायक नसते.
ग्रहणाशी निगडीत सुतक पाळणे, उपवास करणे, गरोदर स्रीला उपाशी ठेवणे, तिला ग्रहण पाहू न देणे, घरातील अन्नपाणी टाकून देणे, ग्रहण सुटल्यानंतर स्नान करणे, या निखालस अंधश्रद्धा आहेत आणि त्या वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाहीत. ग्रहण हे पाळण्यासाठी नसून पाहण्यासाठी आहे हे समजून घेण्याची गरज आहे. या बाबत संघटनेच्या वतीने राज्यभर प्रबोधन करण्यात येत आहे.