माधुरी जाधव यांचाही संकल्प पूर्ण!
सांगली । आता विश्वात्मके देवे; अशी विश्व कल्याणाची प्रार्थना श्री. संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानाने केली. याच श्री. ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित पारायण सुरू व्हावे व हस्तलिखित श्री ज्ञानेश्वरी अतिशय नियम व विशिष्ट पद्धतीने लिहिली जावी; या उद्देशाने इस्लापुरातून हरी भक्तांसाठी सुरू केलेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्यांची संख्या १०० वर पोहोचली आहे.
उरून इस्लामपूर येथील ह.भ. प. कै. रघुनाथ पाटील गुरुजी यांच्या प्रेरणेतून त्यांचे चिरंजीव ह.भ. प. दशरथ पाटील यांनी अक्षर वारी ज्ञानाची… आनंदाची… समाधानाची; असा एक श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखित पारायणाचा उपक्रम अलीकडे सुरू केला आहे. ते स्वतः स्वखर्चाने ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी चा सर्व खर्च करतात. हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या म्हणजेच पारायण करणाऱ्या हरी भक्तांनी श्री. ज्ञानेश्वरी मधील फक्त संस्कृत आतील श्लोक व प्राकृत यातील ओव्या लिहून काढायचे आहेत. त्यामध्ये ग्रंथ जसा आहे तसा लिहायचा असून श्री भगवद्गीतेतील श्लोक लाल रंगाच्या पेनने व इतर सर्व भाग निळ्या रंगाच्या पेनने लिहायचा आहे. याची साधारणतः ६०० च्या आसपास लिखाणाची पाने होतात. जास्तीत जास्त हरिभक्त यांनी या अक्षर यज्ञात सहभागी व्हावे; असे आवाहन ह. भ. प. दशरथ रघुनाथ पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक यासह विदेशातील काहींनी या अनोख्या अध्यात्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा उपक्रम यशस्वी केला आहे.
दोन दिवसापूर्वी इस्लामपूर येथील महादेवनगर मधील श्रीमती माधुरी जाधव यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानिमित्ताने त्यांचे स्वागत ह.भ.प.दशरथ पाटील व इतरांनी केले. यानिमित्ताने ‘राम कृष्ण हरी’ या नामजपसह आणि संत ज्ञानेश्वर, तुकारामांचे अभंग म्हणत हरिभक्तानी सहभाग घेतला. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर नितीन जाधव यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ हरिभक्तानी घेतला.