पावसाळा आला की, सर्वसामान्यांच्या लक्षात येते एक ठळक गोष्ट पावसाचा जोर सहसा दुपारनंतरच वाढतो. सकाळी कडक ऊन, थोडेसे ढग, आणि नंतर अचानक आकाश काळेनिळे होऊन विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. ही नित्याचीच गोष्ट वाटली, तरी त्यामागे विज्ञानाची निश्चित कारणे आहेत.
सकाळी सुर्योदयापासूनच जमिनीवर सूर्यकिरणांचा परिणाम होतो. जमिनीवर पडणाऱ्या या किरणांमुळे पृष्ठभागाचे तापमान हळूहळू वाढते. ही उष्णता शोषून घेतलेले पाणी वाफेच्या रूपाने हवेत मिसळते. हे ‘बाष्पीभवन’ म्हणजेच evaporation, ढग तयार होण्याच्या प्रक्रियेची पहिली पायरी आहे.
गरम आणि दमट वाफेचे थर हवेत वर जातात. वरच्या थरात थंड हवेशी हे थर भिडतात. यामुळे तेथे घनरूप जलबिंदू तयार होतात. अनेक बिंदूंनी एकत्र येऊन ढगांचा आकार घेतला जातो. ही प्रक्रिया जितकी तीव्र, तितके ढग जड होतात – आणि जड झाले की पाऊस कोसळतो.
दुपारनंतर का?
दुपारी १ ते ४ च्या दरम्यान जमिनीचे तापमान सर्वाधिक असते. या वेळेस बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो. त्यामुळे हवेमध्ये वाफ अधिक प्रमाणात मिसळते. वरच्या थरात या वाफेला थंडीचा सामना करावा लागतो – आणि परिणामी ढग, वीजा व नंतर पाऊस!
विजांचा कडकडाट का होतो?
वाफ वर जाताना आणि थंड थराशी भिडताना, ढगांमध्ये घर्षण होते. यामुळे विद्युतभार (static electricity) तयार होतो. जेव्हा दोन ढगांमध्ये या भाराचा फरक जास्त होतो, तेव्हा वीज चमकते आणि कडकडाट होतो. काही वेळांनी जड झालेले ढग पावसाच्या रूपात आपला भार हलवतात.
शहरांमध्ये डांबरी रस्ते, काँक्रिटच्या इमारती यामुळे उष्णता अधिक टिकून राहते. त्यामुळे उष्णतेचा साठा जास्त, आणि परिणामी बाष्पीभवनाची तीव्रता अधिक. यामुळे शहरांमध्ये दुपारनंतर ढग तयार होण्याची आणि पावसाची शक्यता ग्रामीण भागांपेक्षा अधिक असते.
हवामान अभ्यासक सांगतात की, “दुपारनंतरचा पाऊस हा नैसर्गिक प्रक्रियेमुळेच घडतो. याला ‘convectional rainfall’ म्हणतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात असे दृश्य पाहायला मिळते.” विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारनंतर उघड्यावर, विशेषतः झाडांखाली थांबणे टाळावे, असेही त्यांनी सुचवले.
पावसाचा वेळ योगायोग नसून विज्ञानाच्या सूत्रांनुसार घडणारी प्रक्रिया आहे. दुपारची उष्णता, आर्द्रतेचा समतोल आणि हवामानातील घडामोडी – यांमुळे विजांचा कडकडाट आणि त्यानंतर पडणारा पाऊस म्हणजे निसर्गाची आखलेली योजना आहे!
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे. आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.)