राजकारण,समाजकारण,अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेले गाव म्हणून बहे गावाची ओळख. तरी या गावची खरी ओळख कृष्णा नदी पात्रात असणाऱ्या ‘रामलिंग बेटा’मुळे संपूर्ण देशभर आहे. बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो.
बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे ७ कि. मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. १८८४ च्या बॉम्बे गझेटमध्ये बहे गावाचा उल्लेख दिला आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती.रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.त्यामध्ये या गावाचे ‘बाहे’ , ‘बाहोक्षेत्र’ , ‘बाहूक्षेत्र’ इ. नावांनी उल्लेख सापडतात.आता आमचे गाव बहे असे म्हणून ओळखले जाते.मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरून चालत जाता येते.मंदिराच्या परिसरातील आंबा,वड,चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे. तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.
रामलिंग बेटाचे सर्वात उंच अशा मध्यभागी श्री.रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे. प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता- जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिव शंकराची पूजा केली म्हणून यास रामलिंग असे म्हणतात .याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहलेल्या वाल्मिकी रामायणात आहे.पूर्वी येथे छोटे मंदिर असावे हल्लीचे राममंदिर हे १४ व्या शतकात बांधले आहे .मंदिरासाठी फक्त चुना व वीट याचा वापर केला आहे.गाभारा व शिखर वैशिष्टपूर्ण नक्षीकामामुळे सुशोभित आहे.अलीकडे पर्यटन खात्यामार्फत मजबुतीकरण झाले आहे.या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे.
कृष्णा नदीच्या मध्यभागी वसलेल्या या निसर्गसुंदर स्थळाचा पर्यटन विकास होत आहे.जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळे पर्यटन विकासाची अनेक कामे झाली. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र!समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे.
अनेक थोर संत,महात्मे, वारकरी व अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची कल्पना मंत्री मा. जयंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारली आणि आज या बेटाचे स्वरूप बदलले आहे. मंदिर परिसर,तटबंदी,मुख्य दरवाजा,पुजारी निवास,अंतर्गत रस्ते,बागबगीचा,नदी पात्रातील रस्ता अशी पर्यटनासाठी आवश्यक असलेली कामे लोकांच्या आग्रहास्तव राज्य शासनामार्फत पूर्ण झालेली आहेत .काही नियोजित कामे लवकरच मार्गस्थ होणार आहेत.
रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी एका कथेचा उल्लेख सापडतो. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. प्रभू श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन त्यांना झाले. पण हनुमान कुठे दिसेनात, तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना विचारले, “येथे मारुती का नाही?” तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले, “यवनांच्या भयास्तव मारुतीची मूर्ती आमच्या पूर्वजांनी भीमकुंडात टाकली आहे.”तेव्हा समर्थांनी हाक दिली, याविषयी समर्थांनी एका अष्टकात म्हटले आहे –
हनुमंत पाहावयालागी आलो, दिसेना सखा थोर विस्मीत जालो। तयावीण देवालये ती उदासे, जळातूनी बोभाइला दास दासे ।।
त्यानंतर समर्थांनी बाहे गावातील गावकऱ्यांना ११ खंडीचा नैवेद्य तयार करावयास सांगितले व डोहात बुडी मारून मारुतीची ११ गज उंचीची सुवर्णमूर्ती वर काढली. कृष्णाजीपंत बोकील कोरेगावकर ते ही समर्थांबरोबर डोहात गेले. ते ११ प्रहर आत होते. मूर्ती पाण्यातून वर आणल्यानंतर मूर्तीला दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी ११ खंडीचा नैवेद्य तयार केला न्हवता. तेव्हा मारुतीने आज्ञा केली की, कलियुगात ही मूर्ती बाहेर राहणे धोक्याचे आहे व तिची स्थापना केल्यास लोकांत भक्तीऐवजी सुवर्णमूर्ती असल्याने मोह उत्पन्न होईल. तेव्हा तिची स्थापना करु नये. ही मूर्ती परत डोहात ठेवावी. आपल्या हाताने दुसरी मूर्ती तयार करून स्थापन करावी. तेव्हा समर्थांनी ती मूर्ती परत डोहात ठेवून चुना तयार करून तिच्यासारखी दुसरी मूर्ती तयार करून बाहे (बहे) येथील रामलिंग बेटावर मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. हा मारुती रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस आहे. यालाच भव्य मारुती किंवा विक्राळ मारुती असेही म्हणतात. ही मूर्ती भीमरूपी असून फार सुंदर आहे. रेखीय अवयव, तेजस्वी व सुहास्य वदन, समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा मारुती सर्वात मोठा व भव्य मारुती आहे असे म्हटले जाते.समर्थांना मारुतीचे प्रत्यक्ष दर्शन बहे येथे घडले म्हणून त्यांनी १ भीमरूपी स्तोत्र या स्थानास अनुकूलन केले आहे.
रामलिंग- मारुती मंदिराचे बांधकाम,रामलिंग बेटावरील इतर मंदिरे
रामलिंग मंदिर व मारुती मंदिराचे बांधकाम केल्याचा पुरावा इ.स. १८८४ च्या बॉम्बे गेझेट मध्ये सापडतो.
१. प्रवेशद्वार:
२. श्रीरामलिंग मंदिर :
३. गाभारा :
४. मंदिरातील मूर्ती :
५. शिवलिंग :
रामलिंग बेटावरील यात्रा,उत्सव :
रामलिंग बेटावर ४ प्रकारचे यात्रा-उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडले जातात.
विशालतीर्थ यात्रा :
पौष आमावस्येस विशाल महास्नानासाठी मोठ्या उत्साहात विशालतीर्थ यात्रा भरते.२ दिवस असणाऱ्या यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक येतात.पूर्वी बहे गावातुन नदीच्या पात्रातून पाण्याला उतार असे तेव्हा भाविक तेथून ये-जा करीत.यात्राकाळात पूर्वी पाणी जास्त असल्यास भाविकांना बेटावर सोडण्यासाठी काहीलिंचा वापर केला जाई. सध्या हा रस्ता तसा बंद असल्यासारखाच आहे.कृष्णा नदीवरती मोठा पूल आहे.त्याच्याजवळील बंधाऱ्यावरून पुलाखालून नवीन तयार झालेल्या पदरस्त्याने भाविक बेटावर ये-जा करतात. विशालतीर्थ यात्रा ही येथील सर्वात मोठी यात्रा असते.
रामजन्मोत्सव :
चैत्र शुद्ध नवमी ला रामजन्मोत्सवाला अफाट गर्दी होते.
हनुमान जयंती :
चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो.
रामदासनवमी :
माघ वैद्य नवमी ला रामदासनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.
कौटुंबिक पर्यटकांची गर्दी
रामलिंग तीर्थक्षेत्र बेटातील संथ वाहणारे ‘कृष्णा माईचे’ निळेशार पाणी बोडक्या दगडावरून वाहते.तब्बल अंदाजे ४५० फूट लांबीचे पात्र या ठिकाणी कृष्णा नदीला लाभले आहे. त्यामुळे तरुण तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे. जुन्या काळातील उंच बांधलेला पूल. त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या काटेरी दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते.छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो. पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर पाण्याखाली जातो. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य आहे. अनेक हनुमान उपासक श्रावणात व शनिवारी येथे गर्दी करतात.बेटावर जाण्याकरिता नदीतुन बेटापर्यंत जाण्यासाठी एक छॊटा पुल पार करावा लागतो. पुलावरुन जाताना कृष्णेचे विशाल पात्र डोळ्यात भरते. बाजुचे फ़ेसाळणारे पाणी स्वागत करते,या विश्वात प्रवेश करताना आपल्यालाही मुक्त झाल्याचा भास होतो. बेटावर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.