दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख आणि नूतन झलक सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली. ‘आरआरआर’ 7 जानेवारी 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. बाहुबली चित्रपटाच्या व्यावसायिक यशानंतर आरआरआर भारतीय भाषांसोबत एकूण दहा भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात आरआरआर चित्रपटाचे अधिकृतरीत्या चित्रीकरण समाप्त झाले. मात्र आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले .सामाजिक माध्यमांवर अधिकृत घोषणा करताना आरआरआरच्या वृंदाने स्पष्ट केले होते की, ऑक्टोबरपर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आरआरआर चित्रपटाचे निर्मिती नंतरचे संपूर्ण कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु अनिश्चित काळापासून चित्रपटगृह बंद असल्याने नवीन प्रदर्शन तारीख घोषित करणे शक्य नसून चित्रपटास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यावरच नूतन प्रदर्शन तारीख घोषित करण्यात येईल असे आरआरआरच्या वृंदाने सांगितले होते. आता 7 जानेवारीला ‘आरआरआर’ प्रदर्शित होणार आहे.
आरआरआरच्या संगीताचे अधिकार लहरी म्युजिक आणि टी सिरीज या संस्थांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेसाठी प्राप्त केले आहे तर चित्रपटाची निमिर्ती, लायका प्रॉडक्शन, पेन इंडिया लिमिटेड, डीव्हीव्ही एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने केली जात आहे. आरआरआर डिजिटल माध्यमांवर प्रथम प्रदर्शित होणार नसल्याचे पेन इंडिया लिमिटेडने आधीच स्पष्ट केले आहे. चित्रपटात अभिनेते ज्युनियर एनटीआर कोमरम भीम यांची भूमिका साकारणार आहेत तर रामचरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तराचे तंत्रज्ञ-कलाकार अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस, अॅिलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन चित्रपटात सहभागी आहेत. चित्रपटात अभिनेते अजय देवगण, श्रिया सरण आणि आलिया भट यांचा देखील समावेश आहे. ‘ आरआरआर ‘ साठी संगीत एम एम किरवाणी यांचे असून सेंथिल कुमार छायाचित्रकार आहेत. तर कथा जेष्ठ आणि प्रथितयश लेखक, आणि दिग्दर्शक एस एस राजामौली यांचे पिता तसेच बाहुबलीचे रचनाकार के व्ही विजयेंद्र प्रसाद यांची आहे.