ब्राऊन (तपकिरी), सफेद रंगातील गणेश मूर्ती ठरताहेत आकर्षण विजयमाला पाटील : अधोरेखित न्यूज नेटवर्क
सांगली । अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सद्या जोरदार तयारी सुरु आहे. शाडूच्या ‘इको-फ्रेंडली मूर्तीना मागणी आहे. त्यातही पूर्णपणे ब्राऊन (तपकिरी) तसेच सफेद रंगातील गणेश मूर्तीना मागणी वाढताना दिसत आहे.
पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असताना गणेश उत्सवात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापणेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.शाडूची माती मिळणे दुर्मिळ झाले आहे.राज्यात कोल्हापूर,इस्लामपुर,तसेच बहेसह अन्य काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींची बुकिंग सुरू झाली आहे.स्थानिक मूर्तिकारांबरोबरच पेण,मुंबई,पुणे,सोलापूर,कोल्हापूर येथूनही गणेश मुर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या.पण,शाडूच्या ‘इको-फ्रेंडली मूर्तीना मागणी आहे.’दगडूशेठ’ आणि ‘लालबागचा राजा’ या मूर्ती एव्हरग्रीन आहेत आणि याच मूर्तीना ग्राहकांकडून जास्त प्रमाणात मागणी आहे.
त्याचबरोबर साईबाबा रुपात, स्वामी समर्थ, लालबाग,सनातन, बजाप,चिंतामणी, महाराज, बाल गणपती, पाटील, विठ्ठल मूर्ती, ज्ञानेश्वरी या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींनाही मागणी आहे. गणपतीच्या विविध रूपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या आकर्षक व सुबक गणेश मूर्ती सध्या सर्वांचे आकर्षण आहे. साधारणतः एक फुटांपासून तीन फुटापर्यंत शाडूच्या मुर्ती उपलब्ध असल्याचे बहे येथील मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.
शाडूच्या ‘इको-फ्रेंडली मूर्तीमध्ये आकर्षक रंगसंगतीतील मूर्ती उपलब्ध आहेत.त्यातही पूर्णपणे ब्राऊन (तपकिरी) तसेच शुभ्र रंगातील गणेश मूर्तीना वाढती मागणी असल्याचे मूर्तिकार नारायण कुंभार व सुरज कुंभार यांनी सांगितले.शाडूच्या लहान मूर्ती साधारण 750 रुपये तर मोठ्या मूर्तींची किंमत सुमारे पाच हजारांपर्यंत आहे.आमच्याकडील बहुतांश गणेश मूर्तींचे बुकिंग पूर्ण झाल्याचे मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.
इस्लामपुर येथील पोलीस लाइनच्या मागील बाजूस राहणारे मूर्तिकार नारायण कुंभार हे प्रत्येक वर्षी 400 ते 500 शाडूच्या गणेश मूर्ती तयार करतात.सध्या मूर्ती तयार असून रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. कोरोनाचे संकट असतानादेखील शाडूच्या मूर्तीना वाढती मागणी आहे.ही मागणी लक्षात घेऊन पुढील वर्षांपासून शाडूच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभार गेली 40 – 45 वर्षांपासून केवळ शाडूच्याच मूर्ती बनवित आहेत. 6 इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या उंचीच्या गणेशमूर्ती ते बनवतात.साधारणपणे एका लहान गणेश मूर्तीसाठी 1 किलो शाडूचा वापर करावा लागतो.
दुर्मिळ होत चाललेली शाडूची माती,त्यासाठी करावे लागणारे परिश्रम,द्यावा लागणारा वेळ,शाडू मातीची आणि रंगांची किंमत वाढली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तीमुळे होणारे वाढते जलप्रदूषण थांबविण्यासाठी शाडूच्या गणेश मूर्तीला चांगलेच महत्व प्राप्त झाले असून शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे.मागणी वाढत असली तरी शाडूची दुर्मिळता आणि द्यावा लागणारा वेळ तसेच परिश्रम परिणामस्वरूप शाडूपासून गणेश मूर्ती तयार करण्याची ग्राहकांची मागणी मूर्तिकार पूर्ण करू शकत नसल्याबद्दल मूर्तीकार कुंभार यांनी खंत व्यक्त केली.