सांगली । माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ‘आविष्कार कल्चरल ग्रुप’चा 22 वा संगीत महोत्सव शनिवार दि. 10 व रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे.शनिवारी हिंदी सिने सृष्टीतील आघाडीची युवा पार्श्वगायिका पलक मुछाल व पलास मुछाल यांचा ‘दिलसे दिल तक’हा बहारदार हिंदी गीतांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट,तर रविवारी खास रसिकांच्या आग्रहास्तव “रंगबाजी”हा महाराष्ट्रातील पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होत आहे.
इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात सायं.७ वाजता दोन्ही कार्यक्रम होणार आहेत.ही माहिती अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी दिली
पलक मुछाल ही बत्तीस वर्षीय गायिका वयाच्या अडीच वर्षापासून गात आहे.तिने आशिकी 2,प्रेम रतन धन पायो,किक,गब्बर, टायगर,जय हो,गदर, रंग दे बसंती,बजरंग भाईजान,बागी 2,ड्रीम गर्ल यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांना बहारदार गाणी दिली आहेत. तिचे अल्बमही प्रसिद्ध आहेत. पलास मुछाल हा तिचा भाऊ संगीत दिग्दर्शक,आणि निर्माते आहेत. मुछाल कुटुंबाचे सामाजिक काम मोठे आहे. ते आपणास मिळणाऱ्या मानधनातून खर्च वजा जाता उर्वरित रक्कमेतून लहान मुलांच्या ह्रदयविकाराच्या शस्त्रक्रिया मोफत करीत आहेत.
आविष्कारने कला रसिकांच्या खास आग्रहास्तव प्रथमच ‘रंगबाजी’हा महाराष्ट्राच्या पारंपरिक लावण्यांचा नजराना आयोजित केलेला आहे. लावण्यवती मेघा घाडगे,’आई कुठे काय करते’मधील ‘संजना’म्हणजे रुपाली भोसले,’सुख म्हणजे नक्की काय असते’ मधील ‘शालिनी’म्हणजे माधवी निमकर,कलर मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’हा कार्यक्रम गाजवलेल्या तेजा देवकर,स्मृती बडदे,ऐश्वर्या बडदे यांच्यासह लावण्यवती ठसकेबाज लावण्या सादर करणार आहेत.
‘आविष्कार’ने 21 वर्षाची यशस्वी सुरमयी वाटचाल करीत महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.पंडीत जसराज, श्रेया घोषाल,शंकरन महादेव,कुमार सानू, जावेद अली,उदित नारायण,बप्पी लहरी महेश काळे,अशोक हांडे,पद्ममजा फेणाणी यांच्यासह विश्वविख्यात कलावंतांच्या 100 कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. आविष्कारने कौटुंबिक कला दालन उभा केले असून ‘आकर्षक आयोजन आणि सूत्रबद्ध नियोजन’हे आविष्कारचे सूत्र आहे.
आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,उपाध्यक्ष भूषण शहा,सचिव विश्वनाथ पाटसुते,सहसचिव विजय लाड,खजिनदार राजेंद्र माळी,माजी अध्यक्ष सतिश पाटील,माजी सचिव प्रा.कृष्णा मंडले,डॉ.अतुल मोरे,सचिन पाटील,हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील,धनंजय भोसले,विशाल पाटील,विजय नायकल,अनिल पाटील,अक्षय जाधव,प्रशांत पाटील,आप्पासो जावीर यांच्यासह कार्यकर्ते संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.