रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास – शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023
कार्तिक शुद्ध चतुर्दशीला – वैकुंठ चतुर्दशी निमित्त -शिव आणि विष्णूचे पूजन करण्यास सांगितले आहे.निशीथ काळात अर्थात मध्यरात्री असलेल्या चतुर्दशीस विष्णू पूजन करून नंतर अरुणोदय काळी शिवपूजन करावे असे शास्त्र आहे.
शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा विचार करायचा झाल्यास विष्णू व शिव ही एकाच परमात्म्याची कार्यपरत्वे प्रकट झालेली दोन रुपे होय.
हरि हर एका वेलांटीचा फेर म्हणजे स्थिती हे विष्णूचे तत्व,तर लय हे शिवाचे तत्व ,या दोन तत्त्वांचा सुसंवाद अर्थातजीवनात सर्व काही मिळूनही तितक्याच ताकतीने ते सोडूनही देता आले पाहिजे खरं तर हा संदेश या विष्णू आणि शिव अर्थात स्थिती आणि लय या तत्वातून मिळतो असे मला वाटते.
गझलकार सुरेश भट यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ।
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ।
खरं तर हे शास्त्रकारांना सांगायचे असावे.
कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा प्रदोष व्यापींनी साजरी केली जाते .सायंकाळी त्रिपुरवाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
तमसो मा ज्योतिर्गमय
या बाबत एक कथा आहे
तारखा सूर नावाच्या असुराला तीन पुत्र होते .यांची नावे तारकाक्ष,कमलाक्ष विद्युन्माली मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना निक्षुन बजावले की ,देवांच्या वाटेला जाऊ नका.त्यांना त्रास देऊ नका पण शेवटी आसुर ते असुरच.त्यांची वृत्ती जाईना,म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी शंकराने त्यांचा नाश केला आणि त्या त्रिपुरांची होळी केली.अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर विजय मिळवला .हा विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरारी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली.तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषता शिव मंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात.
महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच ,दिवाळी साजरी करीत आहेत.देवांनीच मंदिरे प्रकाशमय केले आहेत असे वाटते.चांगले रुजवावे वाईट तेवढे काढून टाकावे हा विचार यातून मिळतो असे मला वाटते.
याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता – मानवामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती असतात त्यामध्ये चांगल्या आणि वाईट .चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर विजय मिळवावा व आपलं जीवन प्रकाशमय करावं.ज्ञानमय करावं .आपल्या मनातील काम,क्रोध,लोभ, मध मोह मत्सर हे षड् विकार निघून जावेत हा संदेश या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवातून आपणास मिळतो असे मला वाटते.
त्रिपुरारी दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या अंतर्मनात ज्ञानदीप लवून आत्मज्योती च्या प्रकाशात न्हाऊन जाणे म्हणजे खऱ्या त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करणे होय.
तसेच या दिवशी पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा एकत्र योग असताना कार्तिक स्वामी दर्शन घेण्यास सांगितले आहे.
यावर्षी दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवारी दुपारी 03.54 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2023 दुपारी 01.35 पर्यंत कार्तिक स्वामी दर्शन घेवू शकता.
कार्तिकेयानी काम क्रोधादी षड् रिपूंवर विजय मिळवून ते अखंड ब्रह्म समाधीत मग्न झाले.म्हणून अशा दिव्य योग्याचे कृतिका योगावर दर्शन घेणे म्हणजे
षड् रिपूवर विजय मिळवून ज्ञान,बुद्धी,विद्या इ. विचार आत्मसात करणे म्हणजे कार्तिक दर्शन घेणे होय.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.