सांगली । आपल्या विद्यापीठांमधून प्रामुख्याने बी.कॉम.च्या अभ्यासक्रमामध्ये जीएसटी, टॅली यासारखे शिक्षण क्रम अंतर्भूत केले आहेतच त्याशिवाय देखील विद्यार्थ्यांनी थिअरी आणि या विषयाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष ज्ञान देखील घेतले तर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी मिळत जातील,असा विश्वास चार्टर्ड अकाउंटंट उमाकांत कापसे यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कॉमर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एम. जाधव हे उपस्थित होते.यावेळी आपल्या मार्गदर्शनात बोलताना चार्टर्ड अकाउंटंट कापसे यांनी सीजीएसटी, एसजीएसटी,आयजीएसटी अशा विविध कर प्रणालीबाबत यथोचित मार्गदर्शन केले.त्याचबरोबर प्रत्यक्ष व्यापार विश्वातील खरेदी,विक्री,त्याच्या तारखा,त्याची रक्कम आणि जीएसटीचे दर या अनुषंगाने उदाहरणे घेऊन प्रात्यक्षिकासह त्यांनी सविस्तर विवेचन केले.
ते म्हणाले,विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षा या पलीकडे जाऊन जीएसटी,टॅली या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान देखील घ्यावे.
प्राचार्य डॉ.ए. एम. जाधव म्हणाले,एका बाजूला आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत असे म्हणतो परंतु जर आपण आपल्या ज्ञानाबरोबरच व्यवसाय आणि नोकरीला आवश्यक असणारी कौशल्ये विकसित केली, त्यामध्ये जर आपण तज्ञ होत गेलो तर वाणिज्य विश्वात देखील करिअरच्या अधिक संधी आहेत.याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनीही आपल्या मनोगतात जीएसटी कर प्रणालीचे महत्व अधोरेखित केले.
कॉमर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या या एकदिवशीय कार्यशाळेत बी.कॉम, एम. कॉम. आणि डिप्लोमा इन टॅक्सेशन टॅक्सेशनचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. प्राची कांबळे, प्रा. उल्का घारगे, प्रा. मंजुषा पाटील, प्रा. शामल कुंभार आदींनी संयोजन केले. प्रारंभी विद्यार्थिनी पार्वती पाटील हिने स्वागत केले.दिपाली घेवदे हिने आभार मानले. साक्षी थोरात हिने सूत्रसंचालन केले.