विषारी-बिनविषारी सापांना वाचवण्यासाठी लोकांची सर्पमित्राकडे धाव
सांगली | गेल्या 20 वर्षापासून विविध जातीच्या सर्पांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची सेवा कृष्णाकाठच्या सर्पमित्र बजरंग बबन शिरतोडे या युवकाने बजावली आहे. आजवर नाग, मण्यार, घोणस यासारख्या विषारी सर्पांसह सुमारे 4 हजारहून अधिक सर्पांना बजरंग यांनी जीवदान देताना संबंधित कुटूंबियांनादेखील आधार दिलाय.
वाळवा तालुक्यातील बहेचा बजंरग हा एक युवक. दोन हजार सालाच्या दरम्यान बजरंग हा मित्रांसमवेत रत्नागिरीला गेला असता साप कसे पकडायचे, हे मित्रांकडून शिकला. त्यानंतर परमेश्वरावर विश्वास ठेवून प्राणीमात्रांवर दया दाखवत सापांना मारण्यापेक्षा पकडून सुरक्षित ठिकाणी पोहोच करण्यामध्ये त्याचा हातखंडा सुरू झाला.
बहे, बोरगाव, फार्णेवाडी, तांबवे, येडेमच्छिंद्र, इस्लामपूर, वाळवा, जयसिंगपूर अशा अनेक परिसरातून साप, नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामन, टोळ; अशा विविध जातीचे सर्प आढळल्यानंतर कुटूंबियांकडून बजरंगला बोलाविले जाते. 40 वर्षाचा हा युवक लोकांच्या मदतीला कोणतीही अपेक्षा न ठेवता धाऊन जातो.
वडीलोपार्जित शेती अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे अर्थार्जनाचे साधन नसल्याने इतरांची शेती कसायला घेवून त्यावरती बजरंगचा उदरनिर्वाह सुरू असतो. पण, केवळ जीवदया किंवा प्राण्यांच्यावरती प्रामुख्याने सापांवरती दया म्हणून हा छंद बजरंगने जोपासला आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या या कौशल्याचा उपयोग सर्पांना वाचविण्यासाठी करता येतो. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
बजरंग तातडीने त्या स्थळी आपल्या हातातील एका स्टीक (छोटी काठी) सह दाखल होतो. कितीही मोठा व विषारी साप, नाग, घोणस असली तरी तिला तोंडाच्यामागे म्हणजे गळ्याला पकडण्याची एक कलाच त्याला अवगत झाली आहे.
बहे येथील रामलिंग बेटावर व अनेक ठिकाणी 7-8 किलो वजनाची धामण त्यांनी कुशलतेने पकडली आहे. पकडलेले साप सोयीनुसार पिशवीत, पोत्यामध्ये कुशलतेने घेवून त्या सापांना निर्जण स्थळी सुरक्षितरित्या तो सोडतो. त्याचवेळी संबंधित कुटूंबियदेखील सुटकेचा निःश्वास टाकतात. त्यामुळे या परिसरात बजरंग हा सर्पमित्र हनुमानाप्रमाणे अडचणीत धाऊन येणारा मित्र बनत आहे.
…जय बजरंग बली !
अनेकवेळा 30 ते 40 हून अधिक पिल्ले असलेली घोणस यांना त्याने जीवदान दिले आहे.वाळव्यामध्ये एकदा झोपलेल्या बालिकेच्या उशाला फडा काढून बसलेल्या व तिथून हलत नसलेल्या नागाला कौशल्याने बजरंगने पकडले.प्रामुख्याने दोन वर्षापूर्वी आलेला व त्याआधी आलेल्या प्रत्येक महापुरातून अनेकवेळा शेकडो साप कृष्णाकाठच्या घरांमधून, छपरांमधून,वस्त्यांवरती,जनावरांच्या गोठ्यांमधून आढळून येत होते.प्रत्येकवेळी या परिसरातील लोकांकडून बजरंगला कॉल जातो.