सांगली | शाळा-महाविद्यालयांच्या निकाल व प्रवेश ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे बहुतांश गुरुजींची मुले प्राथमिक शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये शिकत आहेत.इंग्रजी माध्यमांचे वाढते आकर्षण,शासनाची दुर्लक्षपणाची भूमिका आणि खासगी शाळांची वाढलेली संख्या यांमुळे सरकारी शाळांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठीची धडपड करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.असे असले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मुले खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.
सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही शहरातील खासगी शाळांकडे ओढा वाढला आहे. नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील गुरुजींच्या मुलांनाही खासगी शाळांमध्ये प्रवेशाचे आकर्षण असते.बहुतांश गुरुजींची मुले खासगी शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसत आहेत.गुरुजींची मुले खासगी शाळांत तर सर्वसामान्यांची मुले मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत अशी सर्वत्र स्थिती आहे.
दिवसेंदिवस शासनाच्या प्राथमिक शाळांचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळेच की काय प्राथमिक शाळांत शिकविणार्या गुरुजींच्या मुलांचाही ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे.जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील वाढती गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याबरोबरच शैक्षणिक दर्जा उंचाविण्याबरोबरच गुरुजींच्या मुलांनाही प्राथमिक शिक्षण घेताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्येच प्रवेश घेण्याविषयी सक्ती करणे गरजेचे आहे.सरकारी शाळांमधील शिक्षकांना अजूनही शालाबाह्य कामे भरपूर असतात.पण,आता,त्यातूनही वेळ काढून काही उत्साही शिक्षक मुलांच्या विकासासाठी वेगळे प्रयत्न करीत आहेत.राज्यस्तरीय यंत्रणेने देखील या शिक्षकांवर विश्वास ठेवला आहे.शिक्षकांच्या अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळेच ई-लायब्ररी, शाळांचे डिजिटलायजेशन, पाठ्यपुस्तकाबाहेरील शिक्षण, ई-लर्निंग असे उपक्रम घेणे शिक्षकांना शक्य होत आहे.
आपल्या अध्यापनावर आपला विश्वास नाही म्हणूनच शिक्षकांचे पाल्य महागड्या खासगी शाळेत शिक्षणाचे धडे घेत नसतील ना? असे नानाविध अनुत्तरित प्रश्न पालकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. आपल्या कृतीतून ज्ञान शिकवणारे शिक्षकच असे करू लागले तर इतर पालकही सरकारी शाळेच्या शिक्षण पद्धतीला दोष देत त्यांचे अनुकरण करणार नाहीत कशावरून? सरकारी शाळा सर्वगुणसंपन्न होण्यासाठी सध्या ग्रामस्थ आणि तरुणांकडून मोठे योगदान मिळत आहे.
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचाच शैक्षणिक दर्जावर विश्वास नसल्यानेच त्यांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेताना दिसत आहेत. शिक्षकांची मुलेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेवू लागली तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत शिक्षणाची सक्ती का, असाही सवाल उपस्थित होत आहे.शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी गुरुजींच्या पाल्यांनाच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती केल्यास जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणावरील विश्वास थोडाफार वाढण्यास मदत होणार आहे.शिक्षण विभागाने गुरुजींच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षणाची सक्ती करणे गरजेचे आहे.
गुरुजी तुम्ही लई हुश्शार!
शिक्षक हे आपल्या अध्यापनातून विद्यार्थी घडवण्याचे काम करतात.मात्र आपण शिकवत असलेल्या शाळेत आपला पाल्य शिकवण्याची त्यांची मानसिकता होत नाही.मग शाळेला शैक्षणिक दर्जा नाही? की त्यांना शिकवता येत नाही? असा सवाल पालक करत आहेत.त्यामुळे असे काही शिक्षक आपले पाल्य खासगी शाळेत दाखल करून त्याला शिकवतात.अशा शिक्षकांना “गुरूजी, तुम्ही लई हुश्शार..! म्हणण्याची वेळ येते.