मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्व जाहिरातींसाठी करावे लागणार पूर्व प्रमाणिकरण
कोल्हापूर | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा.आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेण्याचे निर्देश राजकीय पक्ष व उमेदवारांना दिले असून मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी सर्व कालावधीत सर्व जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणिकरण करावे लागणार आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस पुर्वी मुद्रित माध्यमांमधुन कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातीमुळे कोणतीही अप्रिय घटना घडु नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशीत होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर्व प्रमाणिकरण आणि परवानगी आरपी अॅक्ट १९५१ च्या कलम १२७ ए आणि १२६ (१) अन्वये होते. मतदानादिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रिंट माध्यमाद्वारे प्रकाशित केलेल्या, जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण न झाल्याचे माध्यम सनियंत्रण समितीला आढळल्यास तक्रार दाखल करण्यात येते व त्या जाहिराती पेड न्यूज अंतर्गत नोंदविल्या जातात.
इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी जाहिरात प्रसारणापूर्वी ३ दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करावा. अर्ज दाखल केल्यानंतर २ दिवसात म्हणजेच ४८ तासात त्यावर निर्णय देण्यात येणार आहे. नोंदणीकृत पक्ष नसेल किंवा उमेदवार नसलेल्या इतर व्यक्तीस प्रसारणापूर्वी ७ दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. मतदानादिवशी व मतदानच्या अगोदरच्या दिवशी प्रिंट माध्यमाद्वारे प्रकाशित होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी २ दिवस अगोदर अर्ज सादर करावा. राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. यात जाहिरात निर्मिती खर्च तपशील, जाहिरातीची संहिता व व्हिडीओची कॉपी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दोन प्रतीत, जाहिरात प्रसारण खर्च व कालावधी, उमेदवार किंवा पक्षाचे नाव, स्वतंत्र व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र आवश्यक, सर्व खर्च ड्राफ्ट, चेकद्वारे करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. राजकीय जाहिरातींच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यम कक्ष कार्यालय हे नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात सांख्यिकी कार्यालयाजवळ, दुसऱ्या मजल्यावर आहे.