गुढीपाडवा
मंगळवार : दिनांक -09 एप्रिल 2024
चैत्र पालवी सृष्टी सजली।
हिरवा निसर्ग लता न् वेली।
मंगल वाद्ये मंगल गाणी।
करू उभा गुढी अंगणी।
आमच्या सर्व जातक प्रेमी आणि हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा……!
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा.शालिवाहन शक वर्षाचा आरंभ चैत्र महिन्यापासून होतो.वसंत ऋतूचा आरंभ सुद्धा याच महिन्यापासून होतो ,त्यामुळे चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे.
या चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र -चित्रा नक्षत्राच्या जवळ असतो त्यामुळे याला चैत्रमास असे म्हणतात.पूर्वी याला मधुमास असे देखील म्हटले जायचे.संवत्सराच्या आरंभाचा दिवस म्हणून हा शुभ दिवस आहे.तोरण व गुढ्या उभारून हा आनंद उत्सव साजरा केला जातो.
शास्त्रानुसार,अभ्यंगस्नान कडुलिंबाचे चूर्ण खाणे,वत्सराधिपती अर्थात ग्रह पूजन,पंचांगस्थ गणपती पूजन,वासंतिक देवी नवरात्राचा आरंभ,श्री राम नवरात्रारंभ इत्यादीसाठी शुद्ध प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी पाहिजे असे शास्त्र आहे.
अहोरात्र प्रतिपदा असता अहो रात्रीच्या दिवशी किंवा प्रतिपदेचा क्षय असता फाल्गुन अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा/संवत्सरारंभ साजरा करावा असे शास्त्र आहे.
अधिक चैत्र मास असताना गुढीपाडवा/संवत्सरारंभ इ .अधिक चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी करावे.
मात्र श्री राम नवरात्रारंभ,वासंतिक देवी नवरात्रारंभ,गौरी तृतीया,राम नवमी,महावीर जयंती,हनुमान जयंती,वैशाख स्नानारंभ,अनंगव्रत इत्यादी निज चैत्र मासात करावे असे काल सुसंगत आचारधर्म-दाते पंचांगकर्ते यांच्या ग्रंथात लिहिले आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे म्हणून या दिवशी सर्व कार्यासाठी शुभ आहे असे काही जण मानतात,पण हा गैरसमज आहे.उपनयन,विवाह वास्तुशांती इत्यादीसाठी पूर्ण चैत्र महिना मुहूर्त शास्त्रात अशुभ सांगितला आहे.
मात्र लौकिक साखरपुडा, जावळ ,खरेदी विक्री व्यवसायाचा शुभारंभ इत्यादी गोष्टी साठी मात्र चैत्र मास अशुभ नाही.
गुढी उभी करण्याचा विधी
प्रथम मंगल स्नान करून देव व गुरु याचे पूजन करावे .स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने भूषण करून सूर्योदयी गजाननाचे स्मरण करावे . सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता ब्रह्मा विष्णू महेश यांना नमस्कार करून घरोघरी तोरण बांधून गुढ्या उभ्या कराव्या.याला शास्त्रात ब्रह्मध्वज असे म्हटले आहे.
एक चांगली वेळूची काठी घेऊन,तिला थोडे तेल लावून नंतर स्नान घालावे.त्यावरती हळदी कुंकु भस्माचे पट्टे ओढून,नंतर तिच्या निमुळत्या टोकावर शक्यतो केशरी रंगाचे वस्त्र घडी करून,त्याच्या समवेत लिंबाचा डहाळा,फुलांची व साखरगाठीची माळ एका सूत्राने पक्की बांधून त्यावर कलश उपडा ठेवावा.केसरी रंग-वैराग्याचे प्रतीक,लिंबाचा डहाळा-आरोग्याचे प्रतीक व साखर गाठ हे शुभ घटनेचे प्रतीक आहे.म्हणून याला विशेष महत्त्व आहे.
आपल्या गृहप्रवेशाच्या मुख्य दाराजवळ गुढी उभी करावी.गुढीच्या खाली एक पाट ठेऊन,
ॐ ब्रह्म ध्वजय नमः
या मंत्राने पंचोपचार पूजन करावे.
नंतर –
ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वा भिष्टफलपद ।
प्राप्तेSस्मिन् वत्सरे नित्यंमद् गृहे मंङ्गमं कुरू ॥
अशी प्रार्थना करावी.
त्याचबरोबर अमृता पासून उत्पन्न झालेल्या कडूनिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख,विद्या,आयुष्य व लक्ष्मी संपत्ती प्राप्त होतात.मिरे,हिंग मीठ,ओवा व साखर याच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानाचे चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे.पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण-जंगम व ज्योतिषी यांचे पूजन करून त्यांच्या कडून वर्ष फल श्रवण करावे किंवा आपण वाचावे.याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्ष्टान्न भोजन घालावे.नाना प्रकारची गीते वाद्य पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते.
या दिवशी सरस्वती पूजन म्हणजे पाटीपूजन करण्याची ही प्रथा आहे .
या दिवशी ज्या घटना घडतात त्याच वर्षभर घडत असतात अशी पूर्वपार समजूत आहे.अर्थात त्या समजूतीत काही तथ्य असो वा नसो पण ज्याची सुरुवात चांगली ते कर्म आनंदात पार पडते म्हणून मिष्टान्न भोजन करून,खेळ संगीत,गप्पा ,गाणी गाऊन हा आनंद उत्सव साजरा करावा.त्याच बरोबर धार्मिक पूजा,योग साधना,उपासना,नीती इ. विचार केल्यास या गोष्टी नुसत्या वर्षभर नव्हे तर जन्मभर लाभदायक ठरतात.
सायंकाळी सूर्यास्तापूर्वी हळदीकुंकू लावून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा व गुढी खाली उतरावी.गुढीस बांधलेल्या साखर गाढीचा प्रसाद सर्वांना द्यावा.
(लेखक प्रभाकर जंगम हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.