आचार्य शंकरराव जावडेकर यांचा ६६ वा स्मृती दिन.त्यानिमित्ताने…
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आचार्य जावडेकर यांनी राष्ट्रवादी समन्वयवादी विचारवंत आणि भाष्यकार म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सत्याग्रही समाजवाद ही त्यांची भारतीय विचार परंपरेला देणगी म्हणावी लागेल.
जावडेकर मूळचे मलकापूरचे. त्यांचा जन्म १८९४ चा. वडिलांबरोबर ते इस्लामपूरला आले. त्यांना ६१ वर्षे आयुष्य लाभले. इस्लामपूर, पुणे, मुंबई या परिसरात ते तत्कालीन नेते व कार्यकर्त्यांचे गुरू म्हणून वावरले. स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक, विचारवंत अशा सर्व आघाड्यांवर ते कार्यरत राहिले. त्यांच्यावर वैदिक विचारधारा, पाश्चात्य विचारवंत, लोकमान्य टिळक, गांधी या विदेशी व देशी परंपरांचा प्रभाव होता. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी पेठ येथे अस्पृश्य मुलांसाठी शाळा चालवली. पुणे येथे स्वतःच्या घरी अस्पृश्य मुलांच्या राहण्याची सोय केली. टिळकांच्या राष्ट्रीय विचारांचे अनुकरण करताना ते गांधी विचार आणि भगवदगीतेमुळे प्रभावित झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी गांधींच्या नेतृत्वाखाली 1930, 1932 आणि 1942 ला रत्नागिरी, नाशिक व येरवडा येथे तुरुंगवास पत्करला. ते कृतिशील विचारवंत होते. त्यांनी ३० पुस्तके व ३०० हुन अधिक लेख लिहले. प्रा.ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारी पुस्तिका इंग्रजीत लिहली आहे. ते पुण्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्राध्यापक होते. तिथे प्राध्यापकांना आचार्य म्हणत. हेच नांव त्यांना चिकटले. ते १९४१ ला मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर १९४९ ला पुणे येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तत्कालीन साहित्यिक खांडेकर-फडके यांच्या कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात त्यांनी जीवनासाठी कला ही बाजू घेतली.
आचार्य जावडेकर हे पुढच्या पिढ्यांना लक्षात आहेत ते प्रामुख्याने त्यांच्या ‘आधुनिक भारत’ या ग्रंथामुळे. सहाशे पानांचा हा ग्रंथ १९३८ ला प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे हिंदी व गुजरातीत अनुवाद झालेत. हा ग्रंथ म्हणजे जावडेकरांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीवरील भाष्य होय. व्यक्तिवाद, राष्ट्रवाद, समाजवाद यांचा अभ्यास करून त्यांनी राष्ट्रवादी विचारव्यूह आकाराला आणला. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून ते महात्मा गांधीपर्यंत सर्व समाजसुधारक व स्वातंत्र्य सैनिकांचे कर्तृत्व त्यांनी ग्रंथीत केले. हा ग्रंथ राष्ट्रीय चळवळीचा दस्तऐवज मानला जातो. गीता रहस्यानंतरचा हा थोर ग्रंथ महत्वाची अभिजात साहित्यकृती (Classic) ठरते. राजकारणाला नैतिक अधिष्ठान देऊन अवघड प्रश्नांची अवघड उत्तरे शोधणारे ते अभ्यासक होते. त्यांनी समाजवादी कार्यकर्त्यांना वैचारिक बैठक दिली. जनतानिष्ठ अध्यात्मिक राष्ट्रवाद व समाजवादाची मांडणी केली. प्राचार्य पी.बी.पाटील यांनी त्यांना आधुनिक भारतीय राजकारणाचे आचार्य म्हटले आहे. त्यांनी जावडेकर हायस्कूलसाठी अर्धा एकर जागा दिली. कलापथकाचे प्रयोग करून हे वसतीगृह उभारण्यात आले.
जावडेकरांच्या काही पुस्तकांची शीर्षके अशी :- ‘हिंदी राजकारणाचे स्वरूप’ ‘राज्यनितीशास्त्र परिचय’ ‘राज्यशास्त्र मीमांसा’ ‘लोकशाही’ ‘आधुनिक राज्य मीमांसा’ ‘अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र’ ‘गांधीवाद’ ‘पुरोगामी साहित्य’ ‘शास्त्रीय समाजवाद’ ‘हिंदू मुस्लिम ऐक्य’ या शीर्षकांवरून त्यांच्या विचारांची दिशा लक्षात येते. या पुस्तकांच्या किंमती अत्यल्प होत्या. १९९४ ला त्यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने काही पुस्तकांचे पुनर्मुद्रण झाले. मोरारजी देसाई, स.ज.भगवत, जयप्रकाश नारायण, एस.एम.जोशी, ग.प्र. प्रधान असे अनेक समकालीन नेते त्यांच्या घरी येत असत. राजकारण व तत्वज्ञान हे त्यांचे आस्था विषय होते. त्यांनी ‘लोकमित्र’ ‘नवभारत’ ‘लोकशिक्षण’ ‘स्वराज्य’ ‘साधना’ या नियतकालिकांचे संपादन केले. टिळक विद्यापीठात ‘राष्ट्रसंघटनाशास्त्र’ हा अभ्यासक्रम निर्माण केला. ते तुरुंगात असताना टाईम्स ऑफ इंडिया, विविध वृत्ताचे नियमित वाचन करीत. त्यांनी ‘तुरुंगातील माझी विचारवाढ’ हा लेख लिहून वाचन आणि सहकारी राजबंद्याच्या चर्चेचा उपयोग अधोरेखित केला आहे. ‘राष्ट्रीय प्रश्नांची उत्क्रांती’ ‘धर्ममार्गावरील माझे वाटाडे’ ‘वाल्मिकी आश्रमातील प्रवचने’ असे ३०० हून अधिक लेख लिहले. ते शंकररावदेवांचे सहकारी होते. ‘हत्याग्रही युरोप आणि सत्याग्रही भारत’ या लेखातून त्यांनी अहिंसेचे प्रतिपादन केले. त्यांनी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कार्यकर्ते व नेते यांच्यासाठी यतीधर्म सुचवला. सत्याग्रही समाजवाद ही त्यांची मराठी विचार विश्वाला महत्वाची देणगी होय.
जीवनाच्या अखेरच्या काळात ते विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनाने प्रभावित झाले होते. हा सत्याग्रही, समाजवाद, सर्वोदयवाद उपयुक्त आहे अशी त्यांची धारणा होती. ते लोकसेवकांना यती म्हणत. नैतिकता महत्वाची मानत. ते सत्याग्रही समाजवादाचे प्रवक्ते होते. त्यांच्यामते सत्याग्रहाचा आधार प्रत्येकाची मनोदेवता असला पाहिजे. अराज्यवाद आणि आत्मसत्ता हाच सत्याग्रही वृत्तीचा तर्कशुद्ध निष्कर्ष होय. आचार्य स.ज.भागवतांच्या मते, जावडेकरांनी जनतानिष्ठ अध्यात्मिक राष्ट्रवादाची मांडणी केली. व्यक्तीस्वातंत्र्य, समाज परिवर्तन आणि स्वातंत्र्य चळवळ यांनी एकत्र आणले. राष्ट्रवादाला कर्मयोगी अध्यात्माचा आधार दिला. जावडेकर महाराष्ट्राचे रुसो म्हणून ओळखले जात. त्यांच्या पत्नी सुशिलाबाई, मुलगा प्रभाकर व सून लीलाताई यांनी त्यांच्या लोकशिक्षणाचा वारसा जपला. जावडेकर कर्तव्यनिष्ठ होते. वडिलांच्या निधनानंतर देखील त्यांनी ‘लोकशक्तीचा’ आपला अग्रलेख लिहून पूर्ण केला.
आज जावडेकरांच्या विचारांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांनी आपले संपूर्ण लेखन मराठीतून केले. टिळक, गांधी, देशी राष्ट्रीय तत्वज्ञान, पाश्चात्य विचारवंत यांच्या अभ्यासातून त्यांनी टिळकयुग व गांधीयुग परस्परांना पूरक असल्याची आग्रही भूमिका घेतली. गांधी विचार तळागाळात पोहचवण्यासाठी ते लोकशिक्षक म्हणून भूमिका बजावत राहिले. समाजवादी राष्ट्रसेवा दलाचे ते कृतीप्रवण मार्गदर्शक होते. त्यांनी सांगितलेला नीतीवर आधारित यतीधर्म आजही सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांनी सार्वजनिक जीवनाला नीती व तत्वज्ञानाचे अधिष्ठान दिले.
संदर्भ :-
१) आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर, राजेश्वरी देशपांडे
२) सत्याग्रही समाजवादाचे प्रवक्ते, आचार्य शं. द. जावडेकर
३) आचार्य जावडेकर पत्रे आणि संस्मरणे, संपादन, प्रा.डॉ. तारा भवाळकर
४) आधुनिक भारत, आचार्य शं. द.जावडेकर
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप’चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे