Last Updated on 06 Jul 2026 8:52 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मा. ॲड. धैर्यशील पाटील (बाबा) वाढदिवसानिमित्त लेख…
शिक्षणातून विचार, समाजकारणातून विश्वास, राजकारणातून नेतृत्व आणि वकिली व्यवसायातून न्यायाची बाजू समर्थपणे मांडणारे ॲड. धैर्यशील पाटील (बाबा) हे नव्या पिढीसमोरील आश्वासक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येत आहेत. ज्ञान, कर्तृत्व आणि समाजसेवेचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो.
ईश्वरपूर नगरीतील युवा, सुसंस्कृत, अभ्यासू आणि दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व म्हणून उदयास आलेले मा. ॲड. धैर्यशील (बाबा) पाटील हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
शिक्षण, राजकारण,साहित्य, कायदा आणि समाजकारणाचा समृद्ध वारसा लाभलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. स्व. खा. एस. डी. पाटील साहेब यांच्या जनसेवेचा, लोकसंग्रहाचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा वारसा त्यांच्या रक्तात आहे. सिद्धहस्त लेखक, चित्रकार, अभ्यासू विधिज्ञ आणि विचारवंत ॲड. बी. एस. पाटील (अण्णा) व ईश्वरपूर नगरीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ अरुणादेवी पाटील (माई) यांच्या संस्कारातून त्यांना विचारांची प्रगल्भता, अभ्यासाची सवय, संयम, सुसंस्कृतपणा आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी लाभली. त्यामुळे परंपरेचा अभिमान जपत आधुनिक विचारांनी समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव म्हणून ते शिक्षणक्षेत्रात अत्यंत जबाबदारीने कार्यरत आहेत. शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचारावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि मूल्याधिष्ठित संस्कार मिळावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. शिक्षणसंस्थेचा विकास हा केवळ इमारती उभारण्यात नसून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात आहे, ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.
धैर्यशील पाटील (बाबा) यांचे व्यक्तिमत्त्व अनेक गुणांनी समृद्ध आहे. शांत पण ठाम स्वभाव, अभ्यासपूर्ण मांडणी, कायद्याचे सखोल ज्ञान, लोकांशी आत्मीयतेने संवाद साधण्याची हातोटी, कार्यकर्त्यांप्रति असलेला जिव्हाळा आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे ते अल्पावधीतच अनेकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. त्यांच्याकडे पदाचा गर्व नाही; माणुसकीचा अभिमान आहे. म्हणूनच विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले, शिक्षणाच्या भविष्यातील दिशा घेऊन विद्यापीठाचा अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना अनेकदा मिळाली त्यातूनच त्यांची दूरदृष्टी आणि व्यवस्थापकीय कौशल्यवृत्ती दिसून आली.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आ.जयंतरावजी पाटील (साहेब) यांचे स्नेही, विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची संपूर्ण सांगली जिल्ह्यात विशेष ओळख आहे. उत्तम संघटनशक्ती, नियोजन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि लोकांच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे ते राजकीय क्षेत्रातही आश्वासक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मानणारी त्यांची शैली हेच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे रहस्य आहे.
आज राजकारणक्षेत्राला अभ्यासू, संयमी, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. शिक्षण, कायदा, प्रशासन आणि समाजजीवन यांचा सखोल अभ्यास असलेले धैर्यशील पाटील हे त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भविष्यात राजकीय क्षेत्रात आपल्या आजोबांप्रमाणे प्रभावी नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास असंख्य शिक्षक, पदवीधर, युवक आणि समाजातील विविध घटक व्यक्त करताना दिसतात. शिक्षण, रोजगार, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि युवकांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन ते समाजाचा बुलंद आवाज बनू शकतात, अशी अपेक्षा त्यांच्या असंख्य शुभचिंतकांची आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विनयशीलता. मोठा वारसा लाभूनही त्याचा गाजावाजा न करता शांतपणे कार्य करत राहणे, प्रत्येक व्यक्तीला सन्मान देणे, नातेसंबंध जपणे आणि समाजाच्या विश्वासाला पात्र ठरणे ही त्यांची खरी ताकद आहे. नेतृत्व हे पदामुळे नव्हे, तर लोकांच्या विश्वासामुळे निर्माण होते, याची जाणीव त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश, समाजसेवेची अधिक व्यापक संधी आणि लोकहितासाठी कार्य करण्याचे बळ लाभो, त्यांच्या कार्याचा झेंडा शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेच्या आकाशात अधिक उंच फडकत राहो, त्यांच्या हातून असंख्य जनकल्याणकारी कार्ये घडोत आणि भविष्यात ते सार्वजनिक जीवनात एक प्रभावी, सुसंस्कृत व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून अधिक उंच भरारी घेऊ देत…
ॲड. धैर्यशील पाटील (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा. विजयकुमार शिंदे
विद्यामंदिर हाय. व ज्युनि. कॉलेज, ईश्वरपूर











































































