Last Updated on 01 Jul 2026 11:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनेल’ने मिळवलेला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय हा केवळ एका सहकारी संस्थेच्या सत्तेचा कौल नाही. हा निकाल म्हणजे कृष्णाकाठच्या सुज्ञ जनतेने कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीवर, त्यांच्या ११ वर्षांच्या सुशासनावर आणि विकासाच्या निष्ठेवर पुन्हा एकदा लावलेली विश्वासाची मोहोर आहे. विजयाच्या या क्षणी सर्वसामान्य सभासदांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा भोसले परिवाराच्या अनेक वर्षांच्या निःस्वार्थ जनसेवेचा आणि डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या ऋषितुल्य नेतृत्वाचा सन्मान आहे.
राजकारणात आणि सहकार क्षेत्रात अनेक चढउतार येतात, पण तत्त्वांशी आणि सभासदांच्या हिताशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणून डॉ. सुरेशबाबा भोसले यांचे नाव आदराने घेतले जाते. कारखान्याचे चेअरमन म्हणून गेल्या ११ वर्षांत त्यांनी ‘कृष्णा’ला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, याची पावती सभासदांनी मतपेटीतून दिली आहे. कारखान्याने ऊसाला दिलेला चांगला दर, गळीत हंगामात वेळेत झालेली ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवस्थापन यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे समाधानी होता. यात भर पडली ती म्हणजे सामान्य सभासदांचा भोसले कुटुंबावर असलेला अढळ विश्वास आणि त्यांचे ‘गुडविल’! १२० किलो साखर अन् पाणीपट्टी माफीची आमिषे दाखवणाऱ्या विरोधकांना सुरेशबाबांच्या याच पारदर्शक कारभाराने, शेतकऱ्यांच्या समाधानाने आणि स्वच्छ प्रतिमेने जमिनीवर आणले. त्यांनी केवळ कारखाना चालवला नाही, तर सभासदांच्या मनातील ‘कृष्णा’ या पवित्र मंदिराचे पावित्र्य राखले.
सर्वसमावेशक नेतृत्वाचा आलेख
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आणि भोसले परिवाराच्या जनसेवेच्या प्रवासात युवा नेते आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक ठरले आहे. अतुलबाबांनी केवळ निवडणुका जिंकण्याचे राजकीय गणित मांडले नाही, तर अविरतपणे काम करून जनमानसात अभेद्य स्थान निर्माण केले आहे. त्यांचे वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती, विकासाची उपजत तळमळ आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सहज पोहोचण्याची त्यांची कार्यशैली थक्क करणारी आहे. विधानसभा असो वा कारखान्याची निवडणूक, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्येक वेळी आपल्या रणनीतीने विरोधकांचे डावपेच अपयशी ठरवले आहेत. त्यांच्या याच कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या अपार जिव्हाळ्यामुळे आज कृष्णाकाठचा तरुण आणि ज्येष्ठ मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसतो.
अतुलबाबांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राजकारणाला सामाजिक बांधिलकीची आणि आधुनिकतेची जोड दिली आहे. ‘कृष्णा हॉस्पिटल’च्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत सुलभ आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे असो, शिक्षण क्षेत्राचा विस्तार असो, की गरजूंना वेळेवर मदत करणे असो; अतुलबाबा आज अनेकांसाठी हक्काचा आधारवड बनले आहेत. एखाद्या कुटुंबावर संकट आले की, ‘अतुलबाबांकडे जाऊया, तिथे आपल्याला नक्कीच न्याय मिळेल,’ हा दृढ विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. ही जनमानसातील विश्वासाची पावती कोणत्याही राजकीय पदापेक्षा नक्कीच मोठी आहे. त्यांनी निर्माण केलेला हा ‘माणसे जोडण्याचा पॅटर्न’ आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आदराचा विषय ठरला आहे.
संस्कार, संघटन आणि वज्रमुठ
या ऐतिहासिक यशामागे आदरणीय सुरेशबाबांचे विचार, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि समाजासाठी वाहिलेले आयुष्य हीच सर्वात मोठी प्रेरणा आहे. त्यांनी रुजवलेली जनसेवेची हीच परंपरा आज अतुलबाबा अधिक जोमाने पुढे नेत आहेत. यासोबतच विनायकबाबा भोसले यांचे मजबूत संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि अथक परिश्रम यामुळे भोसले परिवाराची ही वज्रमुठ आज कृष्णाकाठावर अजेय ठरली आहे. भोसले परिवाराने नेहमीच सत्तेपेक्षा लोकसेवेला प्राधान्य दिले आहे, म्हणूनच विरोधकांचे चुनावी जुमले सुज्ञ मतदारांनी धुडकावून लावले.
व्यापक वाटचालीची नवी सुरुवात
कृष्णा कारखान्याचा हा निकाल म्हणजे केवळ एका निवडणुकीचा शेवट नसून, भोसले परिवाराच्या एका मोठ्या आणि व्यापक प्रवासाची नवी सुरुवात आहे. डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे नेतृत्व आता केवळ कराड दक्षिण किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. सार्वजनिक जीवनातील त्यांचा हा दांडगा अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन येणाऱ्या काळात अधिक व्यापक स्तरावर मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.
जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ आणि आदरणीय सुरेशबाबांच्या विचारांची ताकद अशीच उत्तरोत्तर वाढत राहो, हीच सदिच्छा! आदरणीय डॉ. सुरेशबाबा भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, विनायकबाबा भोसले आणि संपूर्ण जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!











































































