Last Updated on 13 Jan 2026 8:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
बहुप्रतीक्षित जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा अखेर आज झाली. बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ७ मतमोजणी फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१; तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीची घोषणा केली.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन असेल. ज्या जागा राखीव आहेत. त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले की, “या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने जमा करता येणार आहेत. तसेच २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, २७ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर २७ जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून, दुपारी साडे तीन वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. तर ०५ फेब्रुवारीला सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेनंतर मतमोजणी सुरु होईल”, असेही वाघमारे यांनी म्हटले.
१ जुलै २०२५ रोजी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली यादी मतदानासाठी वापरण्यात येणार आहे. मतदानासाठी १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनीट वापरण्यात येणार आहे. मतदारानाच्या आधी २४ तास अगोदर प्रचार थांबणार आहे.
कोणत्या १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार?
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे.
- कोकण विभाग – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
- संभाजीनगर विभाग – संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर
जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील
एकूण जिल्हा परिषदा- १२
➤ एकूण जागा- ७३१
➤ महिलांसाठी जागा- ३६९
➤ अनुसूचित जातींसाठी जागा- ८३
➤ अनुसूचित जमातींसाठी जागा- २५
➤ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १९१
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
➤ एकूण पंचायत समित्या- १२५
➤ एकूण जागा- १,४६२
➤ महिलांसाठी जागा- ७३१
➤ अनुसूचित जातींसाठी जागा- १६६
➤ अनुसूचित जमातींसाठी जागा- ३८
➤ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ३४२
सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आयोगाची मागणी मान्य करत १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
➤ १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
➤ अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल.
➤ उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – २७ जानेवारी, दुपारी ३ वाजेपर्यंत.
➤ निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेनंतर जाहीर केली जाईल.
➤ मतदानाचा दिनांक – ५ फेब्रुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल.
➤ मत मोजणी आणि निकाल – ७ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून.
उर्वरित २० जिल्हा परिषदांचा निर्णय कधी?
सुप्रीम कोर्टात येत्या २१ जानेवारी रोजी ओबीसी आरक्षण व बांठिया आयोगाच्या वैधतेच्या मुद्यावर ऐतिहासिक सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा व सभापती पदांचे आरक्षण यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत, ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांबाबत सुप्रीम कोर्टातील २१ जानेवारीच्या निकालानंतर निर्णय घेतला जाईल. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाईल.












































































