Last Updated on 29 Sep 2026 7:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दहा दिवसात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकांची केली प्रत्यक्ष पाहणी
सांगली । सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांत खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाला आहे. या अनुषंगाने संबंधित तालुक्यात पिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीक पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ करून, पंचनाम्याची कार्यवाही दहा दिवसात प्राधान्याने व जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्वतः कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी विशाल यादव, कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, तालुका कृषि अधिकारी रमेश भंडारे, निवासी नायब तहसीलदार संजय पवार आदिंसह महसूल व कृषि विभागाचे अधिकारी, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची आणि केरेवाडी या गावात भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी कमी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची स्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी प्रातिनिधीक संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेला खर्च, नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पीक पाहणी व नुकसानीच्या नोंदीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच, पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित निकषानुसार मदत व संबंधित योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी टँकर्स उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, महसूल व कृषी विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद घ्यावी. शेतनिहाय माहिती, पिकाखालील क्षेत्र, पेरणीची तारीख, पिकाची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची व केरेवाडी परिसरातील शेतांमध्ये कमी पावसामुळे पिके सुकल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. कुची येथील नानासो वसंत पाटील आणि केरेवाडी येथील अमीर हसीम मुल्ला यांच्या पिकाची पाहणी यावेळी करण्यात आली. पिकाखालील क्षेत्राची नोंद, मशागत, पेरणी, खते, बियाणे व मजुरी आदिंसाठी झालेला खर्च आणि कमी पावसामुळे सध्या पिकांची वाढ खुंटली असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. कमी पावसामुळे ओलाव्याअभावी पीक सुकल्याचे नमूद करण्यात आले आहे.











































































